स्थायीच्या सभेत आरोग्य निरीक्षकाची झाडाझडती; १८० विकासकामांना सातारा नगरपालिकेचा हिरवा कंदील

by Team Satara Today | published on : 02 April 2026


​सातारा : सातारा नगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ही सभा केवळ विकासकामांच्या मंजुरीसाठीच नव्हे, तर प्रशासकीय हलगर्जीपणावर ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे चांगलीच वादळी ठरली. या बैठकीत नगराध्यक्षांनी आरोग्य विभागाचे निरीक्षक राकेश गलीयल यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

​सभेच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागाच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असताना अधिकारी सुस्त असल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. नगराध्यक्षांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात गलियल अपयशी ठरल्याने, त्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव थेट वरिष्ठ कार्यालयाकडे म्हणजेच शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही सभा कडक इशारा देणारी ठरली.

​दुसरीकडे, शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या १८० विषयांना या सभेत मंजुरी देऊन विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला. सभासचिव वर्षा पाटील यांनी अजेंड्यावरील विषयांचे वाचन केले. एकूण १८५ विषयांपैकी ५ विषय दुबार असल्याचे निदर्शनास आल्याने ते रद्द करण्यात आले. मंजूर विषयांमध्ये प्रभाग १ ते ४ मध्ये नवीन एलईडी दिवे बसवणे, राजवाडा तांदूळ आळी येथील कस्तुरबा रुग्णालयाची धोकादायक इमारत पाडणे आणि शाहूपुरी भागातील पाइप ड्रेन, रस्ता डांबरीकरण व गटर बांधकामाच्या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे.

​यावेळी आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी विभागामार्फत राबवलेल्या मोहिमांची माहिती दिली. मात्र, कचरा संकलनाबाबत कर्मचाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. या सभेला उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर, नियोजन सभापती अशोक शेडगे, बांधकाम सभापती विनोद खंदारे यांच्यासह विविध समितीचे सभापती व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हनुमान जयंतीनिमित्त साताऱ्यात घुमला भीमरूपीचा गजर
पुढील बातमी
तमाशा कलावंतांवरील भ्याड हल्ल्याचा विद्रोही सांस्कृतिक चळवळीकडून निषेध; संरक्षणाची मागणी

संबंधित बातम्या