विठोबा-बिरोबा, सिद्धनाथ देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून निर्णय; भाविकांमध्ये समाधान

by Team Satara Today | published on : 08 November 2025


सातारा :  राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेंतर्गत सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव येथील श्री विठोबा बिरोबा देवस्थान आणि गारळेवाडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थान या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याचा निर्णय राज्य निकष समितीने घेतला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे यासंदर्भात मागणी करण्यात आली होती.

माण, खटाव तालुक्यांसह सातारा जिल्ह्यातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या विकासाचे प्रस्ताव मंत्री गोरे यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. त्यातील अनेक देवस्थानांना तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा देण्याचे निर्णय गेल्या सहा महिन्यांत घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वर कुरोली येथील विठोबा बिरोबा आणि गारळेवाडी येथील श्री सिद्धनाथ या देवस्थानांच्या विकासासाठी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. भाकणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि धनगर बांधवांचे कुलदैवत असलेल्या देवस्थानांच्या विकासासाठी निधी देण्याचा शब्द मंत्री गोरे यांनी दिला होता. मुंबईत 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत या दोन्ही तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुनील माने यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी; जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा; रविवारी रहिमतपूरमध्ये पक्षप्रवेश सोहळा
पुढील बातमी
अजित पवारांच्या सांगण्यावरून मराठा पोर्टल बंद; हजारो युवकांचे नुकसान : नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप, आरोपांमुळे एकच खळबळ

संबंधित बातम्या