सातारा : सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर नगरसेवकांची संख्या 39 वरून 50 झाली असली, तरी शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांना अद्याप पुरेशा सुविधा मिळालेल्या नाहीत. योग्य नियोजन झाले असते, तर सातार्यात तीन नगराध्यक्षपदे निर्माण झाली असती, असे मत सातारा पालिकेच्या नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार शरद काटकर यांनी व्यक्त केले. निवडणूक प्रचारात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
शाहूपुरी, शाहूनगर परिसर नगरपंचायतीत रुपांतरित झाला असता, तर विकासाला उभारी मिळाली असती. शाहूनगर ग्रामपंचायत हा त्या काळचा अॅक्टिव्ह भाग होता. तेथे नागरी सुविधा चांगल्या प्रमाणात आहेत. गडकर आळी, सैदापूर, कोंडवे ते वाढे फाटा असा हा विस्तृत नागरी परिसर होता. तेथे नगरपंचायत झाल्यास विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असता. त्याचप्रमाणे विलासपूर, संभाजीनगर, कोडोली आणि खिंडवाडी हा त्रिशंकू परिसर एकत्र करून, स्वतंत्र नगरपंचायत झाली असती, तर या भागालाही स्वतंत्र नगराध्यक्ष मिळाला असता आणि विकासाला गती मिळाली असती, असे ते म्हणाले.
मतदानास अवघे चार दिवस बाकी असताना, अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हे देण्यात आली. त्यावर काटकर यांनी टीका केली. उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचार सुरू झाला, पण चिन्ह बुधवारी (दि. 26) रात्री मिळाले. विविध परवानग्यांसाठी एक दिवस जातो. हे जाणूनबुजून केलेले राजकारण आहे का? अपक्षांना लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ‘अपक्षांविरोधातील खेळी’ हा मुद्दा चर्चेत आल्याचे त्यांनी सांगितले. कास तलावाची पाणीपातळी वाढली असून, सायफन पद्धतीने शाहूपुरीपर्यंत, अगदी चौथ्या मजल्यापर्यंतही पाणी पोहोचू शकते; परंतु यासाठी आवश्यक प्रयत्न आमदार, खासदारांनी केले नाहीत. निधी उपलब्ध असूनही, इच्छाशक्ती नसल्याने सातार्याचा विकास थांबला. बारामतीसारखी प्रगती सातार्यालाही शक्य होती, असे ते म्हणाले.
सातार्यातील राजकारण व्यक्तीपातळीवर अडकले आहे. सुरुची बंगला आणि जलमंदिरातून होणारे निर्णय, काही लोकांच्या हुकमावर होतात. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. सर्वांनी एकजूट दाखवल्यास शहराची दिशा बदलू शकते. पुण्यातील फुरसुंगी, बेकराईनगर व उरळी कांचन हे भाग महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर, पुन्हा स्वतंत्र नगरपंचायत बनले. तशाच पद्धतीने सातार्यात शाहूपुरी, शाहूनगर नगरपंचायती झाल्या असत्या तर विकासासाठी मोठा निधी मिळाला असता. सातार्यात मोठ्या संख्येने अपक्ष उभे आहेत. त्यावर काटकर म्हणाले, दोन्ही राजांविरुद्ध लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुकीच्या निमित्ताने लोकांची खदखद उफाळून आली असून, याची प्रचिती 2 डिसेंबरला मतदानातून नक्की येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.