दहिवडी : नरवणे (ता. माण) येथे अपघाताचा बनाव करून प्रेयसीने आईच्या मदतीने प्रियकराचा निर्घृण खून केला. खुनानंतर प्रियकराचा मृतदेह कारमध्ये ठेवून ती कार कालव्यात ढकलून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी प्रेयसी, तिच्या आईसह सात जणांवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
योगेश सुरेश पवार (वय 28, रा.गोंदवले बुद्रुक, ता. माण) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर रोशनी विठ्ठल माने व आई पार्वती विठ्ठल माने यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश पवार याचा भाऊ तेजस याने मंगळवार (दि. 18) संध्याकाळपासून भाऊ योगेश गायब झाल्याची तक्रार दहिवडी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर सपोनि दत्तात्रय दराडे यांनी त्याचा शोध सुरू केला होता. चारचाकी गाडीसह योगेश गायब झाल्याने व त्याचा फोन स्विच ऑफ झाल्याने घातपात झाल्याच्या संशयावरून तपासाची चक्रे गतीमान केली.
गुरुवार दि. 20 मार्च रोजी नातेपुतेजवळील फडतरवाडी हद्दीत पोलिसांना एक चारचाकी कालव्यामध्ये बुडालेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांनी ही कार जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढली असता ती आतून लॉक होती. त्यामध्ये योगेश पवार याचा मृतदेह असल्याचेे आढळले. योगेशच्या मोबाईलवरील शेवटच्या कॉलवरुन त्यांनी संशयितांना मुंबई येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने योगेशचा खून केल्याची कबुली दिली. दहिवडी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
मंगळवार, दि. 18 मार्च रोजी सायंकाळी योगेश पवार याला रोशनी माने हिने ‘मला तुला भेटायचे आहे. तसेच आम्ही हात उसने घेतलेले पैसे परत द्यायचे आहेत ’, असे फोनवरून सांगून योगेशला नरवणे येथे बोलावून घेतले होते. रोशनी व तिची आई पार्वती माने यांच्यासह अन्य साथीदारांनी योगेश व रोशनी यांच्यात असलेल्या प्रेम संबंधातून व हात उसने घेतलेल्या पैशाच्या कारणावरून योगेशला धारदार शस्त्राने मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी योगेशचे हातपाय बांधून कारच्या पाठीमागील शिटवर बसवून कार कालव्यात ढकलून दिली.