कोरेगाव : करंजखोप, ता. कोरेगाव येथील शारदाबाई गोविंदराव पवार माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या अनियमित उपस्थितीला कंटाळून, आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी शाळेच्या गेटला टाळे ठोकले. शिक्षक वेळेवर न येणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे, बायोमेट्रिक हजेरी व सीसीटीव्ही यंत्रणा बंद असणे, अशा तक्रारींचा निपटारा न झाल्याने ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया उमटली.
ग्रामस्थांच्या मते, गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक शाळेत वेळेवर येत नाहीत. प्रार्थना नियमित घेतली जात नाही. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरली असून, शाळेचा कारभार ढिसाळ झाला आहे. याबाबत शिक्षण संस्थेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही, कोणतीही दखल घेतली गेली नाही.
पालक व नागरिक मोठ्या संख्येने शाळेसमोर जमले
त्यामुळे ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी 9 वाजता शाळेच्या गेटला टाळे ठोकून, निषेध व्यक्त केला. गुरुकुलचे तास सुरू असतानाही अनेक शिक्षक अनुपस्थित होते. परिणामी काही विद्यार्थी शाळेबाहेर फिरत होते. उशिरा आलेल्या शिक्षकांशी ग्रामस्थांची शाब्दिक बाचाबाचीही झाली. यावेळी पालक व नागरिक मोठ्या संख्येने शाळेसमोर जमले. शाळा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या गोंधळाची माहिती मिळताच, शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी दिनेश दाभाडे यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांची समजूत घातली. पुन्हा असे गैरप्रकार होणार नाहीत, याची हमी त्यांनी दिल्यावर ग्रामस्थांनी टाळे उघडले. यावेळी राजेंद्र धुमाळ, सतीश धुमाळ, रमेश जाधव, पिलाजी धुमाळ, धनंजय धुमाळ, नितीन धुमाळ, अमोल धुमाळ, विलास जगताप, पोलीस पाटील, विनोद वर्पे, ग्रामसेवक सागर पानसरे, सिराज शेख उपस्थित होते.