सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे .साताऱ्यात झालेल्या मेळाव्यामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी समविचारी पक्षांशी वेळप्रसंगी युती करून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू तसेच गट आणि गणांमध्ये प्रबळ उमेदवार निश्चित दिले जातील, अशी स्पष्ट ग्वाही दिली.
आपल्या मनोगत आदरम्यान सातारा जिल्ह्यातून यशवंत विचार बाजूला पडला आहे आणि हा यशवंत विचार टिकवण्याची जबाबदारी ही आपली आहे जिल्हा परिषद आपल्याला घड्याळाच्या ताब्यात ठेवावी लागेल त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहन मकरंद पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा मेळावा व नूतन नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार आणि जाहीर पक्षप्रवेश अशा संयुक्त कार्यक्रमात मकरंद पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली. यावेळी खासदार नितीन पाटील, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, सुनील माने, प्रताप पवार, नितीन भरगुडे-पाटील प्रभाकर देशमुख, भाग्यश्री भाग्यवंत, शिवरूपराजे खर्डेकर, सीमा जाधव, स्मिता देशमुख उदय कबुले सह्याद्री कदम, प्रदीप विधाते, संजय देसाई, सुरेंद्र गुदगे संजय गायकवाड राजेश पाटील वाठारकर प्रमोद शिंदे विक्रम बाबा पाटणकर, शहाजीराव क्षीरसागर, निवास शिंदे, शिवाजीराव महाडिक सुभाष नारळे, यांची प्रमुख उपस्थिती होती .
मकरंद पाटील पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातून यशवंत विचार बाजूला पडण्याची भीती निर्माण झाली आहे तो यशवंत विचार जपण्याची जबाबदारी आपली आहे. जिल्हा परिषद आपल्याला राष्ट्रवादीच्या परंपरेप्रमाणे ताब्यात ठेवावी लागेल राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून आणून जिल्हा परिषद घड्याळाच्या ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. तिकीट न मिळाल्याने काहींनी नगरपालिका निवडणुकीत चुकीची भूमिका घेतली आपापसातील मतभेद विसरून आपल्याला वाटचाल करत यश मिळवायचे आहे. जिल्ह्यात गट आणि गणनिहाय प्रबळ उमेदवार शोधावे लागतील. इच्छुकांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 तारखेपर्यंत पक्षाकडे अर्ज करावा 14 व 15 रोजी याबाबतच्या मुलाखती घेतल्या जातील तसेच मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटी स्थापन करण्यात येईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला..
खासदार नितीन काका पाटील म्हणाले पालिका निवडणुकीमध्ये ज्या त्रुटी राहून गेल्या त्या टाळून आता नव्याने पुन्हा आपल्याला आव्हाने पिण्याची वेळ आली आहे समविचारी व न्याय देणाऱ्या पक्षाशी युती केली जाईल प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीची चर्चा करून उमेदवारी बाबत निर्णय घेतला जाईल. मात्र राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील त्यासाठी संघटनात्मक पातळीवर आपल्याला काम करावे लागेल, असे आवाहन नितीन पाटील यांनी केले.
यावेळी सुनील माने, प्रभाकर देशमुख, नितीन बानगुडे-पाटील यांनी सुद्धा आपली मनोगते व्यक्त केली. चुकीचे प्रवाह आणि परंपरा जिल्ह्यात सुरू होत असून त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी आपल्याला धोरण ठरवून संघर्ष करावा लागेल, अशी भूमिका यांच्या मनोगत आतून व्यक्त झाली. बाळासाहेब सोळसकर यांनी प्रास्ताविक केले श्रीनिवास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.