सातारा : सातार्यात प्रतिबंधित ड्रग्जचे इंजेक्शन देणार्याला अटक केल्यानंतर शहर पोलिसांनी शिकावू डॉक्टरसह एकूण आणखी तिघांना अटक केली. न्यायालयात त्यांना हजर केले असता ६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सातारा पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला असून आणखी अटकसत्र वाढणार आहे.
साईकुमार महादेव बनसोडे (वय २५, रा.भोसे ता.पंढरपूर, जि.सोलापूर), सुदीप संजय मेंगळे (वय १९, रा.सदरबझार, सातारा), अतुल विलास ठोंबरे (वय २०, रा. झेडपी काॅलनी, शाहूपुरी, सातारा) अशी अटक केलेल्यांची व पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. यातील साईकुमार बनसोडे हा शिकावू डॉक्टर आहे.
सातारा शहर पोलिस दोन दिवसांपूर्वी शहरातील चारभिंती परिसरात गस्त घालत असताना शिवराज पंकज कणसे (वय २५, रा.हिलटॉप सोसायटी, सदरबझार, सातारा) याला पकडले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मेफेंटरमाईन नावाचे नशा करण्याचे इंजेक्शन हाेते. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ११ हजार रुपयांचा साठा जप्त केला. यानंतर आणखी तिघांना अटक केली.