सातारा : कोणाच्यातरी वडिलांची, महाराष्ट्राच्या लेकाची क्रुर हत्या ज्यांनी केली, अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. अशा लोकांबद्दल राज्यातील कोणत्याही नेत्याला आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहजे. अशा प्रवृत्तीला कोणत्याही पक्षातून मदत करण्याची भूमिका होत असेल तर त्या पक्षातून त्यांना काढून टाकले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल केली आहे.
जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमीत्त त्यांच्या कराड येथे समाधिस्थळी खासदार सुळे यांनी आज अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
धनंजय मुंडे यांनी परळी येथे एका जाहीर सभेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढली. आज 9 ते 10 महिने झाले, जगमित्र कार्यालय चालू आहे. काम सुरु आहे. हे सगळं बोलताना आपल्यासोबत एक व्यक्ती नाही, याची जाणीवही होते. काय चुकले काय नाही ते न्यायालय बघेल, पण ती जाणीव नक्कीच आहे, असे मुंडे म्हणाले होते. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुंडे याच्या वस्तव्याचा मी जाहीर निषेध करते. कोणाच्या तरी वडिलांची, महाराष्ट्राच्या लेकाची क्रुर हत्या ज्यांनी केली, अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. अशा लोकांबद्दल राज्यातील कोणत्याही नेत्याला आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहजे. अशा प्रवृत्तीला कोणत्याही पक्षातून मदत करण्याची भूमिका होत असेल तर त्या पक्षातून त्यांना काढून टाकले पाहिजे, अशी माझी पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे. असे वक्तव्य होत असेल तर ते महाराष्ट्राच्या एेक्यासाठी घातक आहे. क्रुर हत्येमागच्या लोकांची यांना आठवण असेल तर यांची विचारधारा काय आहे याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "निधी माझ्याकडे आहे", मंत्री चंद्रकांत पाटील यांनी "चावीचा मालक आमचा आहे" असे वक्तव्य केले. त्यावर खासदार सुळे म्हणाल्या, निवडणुकीमुळे अशी विधाने केले जात आहेत. माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की राज्याची तिजोरी ही राज्यातील जनतेकडे असते. तो पैसे जनतेचा आहे, मालक ही जनता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जनतेला तो हक्क दिला आहे.