संविधानातील मूल्ये जपणे गरजेचे- डॉ. प्रकाश कांबळे, कला व वाणिज्य महाविद्यालयात संविधान दिवस उत्साहात

by Team Satara Today | published on : 27 November 2025


सातारा : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात संविधान दिवस विविध उपक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी भूषविले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग व समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. उदय लोखंडे यांच्या सुबोध व प्रेरणादायी प्रस्ताविकाने झाली. त्यांनी संविधान दिनाच्या उपक्रमांचे महत्त्व, विद्यार्थी व नागरिक म्हणून संविधानिक मूल्यांचे पालन करण्याची जबाबदारी आणि शिक्षण संस्थांची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि लोकशाहीची अधिष्ठाने यांची विद्यार्थ्यांना जाण करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी मांडले.

यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांनी संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आणि संविधानातील सामाजिक, आर्थिक व राजकीय मूल्यांचा व्यापक आढावा उपस्थितांना दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास करण्याचे व त्यातील मूल्ये दैनंदिन आचरणात आणण्याचे आवाहन केले. संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून ते भारतीय समाजाला एकत्र बांधणारे बंधन आहे, असे ते म्हणाले.

प्रभारी प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. संविधान दिवस विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. गुणवत्ता आधारित शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज त्यांनी अधोरेखित केली. संविधानाने राष्ट्राच्या विकासाला दिशा दिली असून विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिकत्व जपणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे वेळी भित्तीपत्रिकेचे अनावरण  पार पडले. कार्यक्रमास महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान प्रास्ताविकेचे वाचन, संविधानाशी निष्ठा व्यक्त करण्याची शपथ आणि लोकशाही मूल्यांवरील संवाद यांसारख्या उपक्रमांनी कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला.

कार्यक्रमाचा समारोप प्रा. सुनीता गायकवाड यांच्या आभारप्रदर्शनाने झाला. त्यांनी सर्व मान्यवर, संयोजक विभाग, स्वयंसेवक व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथे संविधान दिवस सद्भाव, लोकशाही मूल्यांचा सन्मान आणि भारतीय संविधानाच्या गौरवपूर्ण परंपरेचे पुनरुज्जीवन या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यात 1 कोटी 15 लाख क्विंटल साखरेची निर्मिती; 154 कारखान्यांकडून गाळप सुरू
पुढील बातमी
सरकारी कामात अडथळा आणणार्‍यास दोन वर्षे कारावास; कराड न्यायालयाचा निकाल

संबंधित बातम्या