सातारा : नागपूर येथील अधिवेशनात मंत्री जयकुमार गोरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. ‘कृषिमंत्री पद घ्यायला कोण तयार नव्हते. शेतकऱ्यांचा तळतळाट लागतो’, असे वक्तव्य आ. शिंदे यांनी केल्यानंतर ना. गोरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘राजकारणावर बोलू नका, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. तळतळाट तुम्हालाच लागलाय’, असा चिमटा त्यांनी काढला.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी ना. जयकुमार गोरे व आ. शशिकांत शिंदे यांची जुगलबंदी रंगली. शेतकरी कर्जमाफी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, तुम्हाला माहीत नाही कृषी मंत्रिपद घ्यायला कोण तयार नव्हतं. ज्यांनी ज्यांनी कृषी मंत्रिपद घेतले त्यांची त्यांची खुर्ची गेली आहे. मात्र, तुम्हाला ग्रामविकास विभाग मिळाल्याने तुमची खुर्ची वाचली आहे. पण ज्यांनी हे मंत्रिपद घेतले त्यांचे खाते बदल झाले. ना. मकरंद पाटील यांनाही कृषी मंत्रिपदाबाबत विचारणा झाली. मात्र, त्यांनी नकार दिला. मग शेवटी दत्तामामा भरणे यांना कृषी मंत्रिपद दिले. शेतकऱ्यांची जी तळमळ असते, तळतळाट असतो तसेच त्यांचा जो रोष आहे याचा परिणाम असल्याचे आ. शशिकांत शिंदेंनी म्हटले. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्यावे, असेही आ. शिंदेंनी ठणकावले.
त्यावर ना. जयकुमार गोरे यांनीही आ. शशिकांत शिंदे यांना चिमटा काढला. ते म्हणाले, तुम्ही भाषण चांगलं करता. शेतकऱ्यांचे प्रश्न धडाडीने मांडता. शेतकऱ्यांचा तळतळाट लागल्यावर काय होते ते त्यांनी सांगितले. हा तळतळाट लागल्यानेच ते तिकडे बसले की काय? तुम्ही शेतकऱ्यांची तळमळ असणारे नेते आहात. त्यामुळे शेतकरी प्रश्नावर बोलावं, राजकीय प्रश्नावर बोलू नये, असेही ना. गोरे म्हणाले.