सातारा (गजानन चेणगे) : मंजूर पदांची संख्या १२ आणि प्रत्यक्षात कामावर दोन-तीनच अशी दीनवाणी अवस्था सातारा जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागासाठी कार्यरत असलेल्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या कार्यालयाची झाली आहे. मात्र, अशा परिस्थितीत अवाढव्य कामाचा गाडा चालवणे ही अवघड गोष्ट असताना अधीक्षक सुनील शिखरे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार वेळच्यावेळी होत आहेत.
सातारा जिल्ह्यात साडेसातशे माध्यमिक शाळा असून त्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या साडेआठ हजारच्या आसपास आहे. त्या अनुषंगाने आठ लेखाशीर्ष आहेत. हा सर्व व्याप सांभाळण्यासाठी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकासाठी एक अधिक्षक, आठ वरिष्ठ सहाय्यक, एक कनिष्ठ लिपिक आणि दोन शिपाई अशी एकूण बारा पदे मंजूर आहेत. मात्र यामध्ये दोनच वरिष्ठ सहाय्यक कार्यरत आहेत. कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेली व्यक्ती शुक्रवारी ३१ ऑक्टोबरलाच निवृत्त झाली. दोन शिपाई पदांपैकी एक कार्यरत असून तेही जानेवारीत निवृत्त होणार आहेत. म्हणजे कागदावर १२ आणि कामावर फक्त दोन-तीनच अशी या कार्यालयाची दीनवाणी अवस्था आहे.
ही अशी अवस्था असताना हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची आणि भविष्य निर्वाह निधीची कामे वेळेत कशी होणार हा यक्षप्रश्न आहे. तरीही सर्व कामे वेळच्या वेळी होत आहेत हे विशेष. महिन्याचे पगार पहिल्या तारखेला आणि त्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास ३१ तारखेला होणारच असा पायंडा अधीक्षक सुनील शिखरे यांनी पाडला आहे. तुटपुंज्या मनुष्यबळावर हे अशक्य वाटणारे काम शक्य करण्यासाठी त्यांच्यावर किती ताण पडत असेल याची कल्पनाच केलेली बरी. अन्य कार्यालयात पैशाशिवाय कागद हलत नाही. लाचलुचपतच्या ट्रॅपमध्ये अधिकारी-कर्मचारी अडकत आहेत. मात्र शिखरे यांच्या कडक शिस्तीमुळे या कार्यालयात भ्रष्टाचाराचा वारा नाही. त्यामुळे दलालांना थारा नाही. परिणामी बदलीने या कार्यालयात येण्यासाठीही कोणी उत्साह दाखवत नाही असे दिसते.
नैतिक पातळीवर दबदबा
सरकारी कार्यालयातील कामकाजाची पद्धत सर्वसामान्य माणसाला मेटाकुटीला आणत असते. त्यामुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब असा वाक्प्रचार प्रचलित आहे. तथापि, अधीक्षक शिखरे यांच्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टींना पायबंद बसला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयाचा जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांना येणारा अनुभव खूप वेगळा आहे. त्यामुळे या कार्यालयाचा नैतिक पातळीवर दबदबा असून शैक्षणिक क्षेत्रात शिखरे यांचे नाव आदराने घेतले जाते. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांच्याकडे अधीक्षक पदाची सूत्रे आहेत. तेव्हापासून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनाची तारीख चुकलेली नाही. आधीचा अनुभव गाठीशी असलेल्यांच्यासाठी हे आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासारखे आहे.
विहित कालावधीत सेवा देण्याचा आटोकाट प्रयत्न अधीक्षक सुनील शिखरे करत आहेत. पण तुटपुंज्या मनुष्यबळामुळे त्यात अडचण येत आहे. ताण वाढत आहे. त्यामुळे सुनील शिखरे रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत कार्यालयातच संगणकावर काम करताना दिसतात. घरी गेल्यावरही लॅपटॉपवर हेच काम, सकाळी घरातही हेच काम असा त्यांचा दिनक्रम आहे. जुन्या कर्मचाऱ्यांना ऑनलाइन कामाचा फारसा अनुभव नसल्यामुळे तेही काम त्यांना करावे लागते. पण कितीही परिश्रम करावे लागो, वेळच्यावेळी पगार हा नियम त्यांनी पाळला आहे.
खाजगी प्राथमिक शाळांचाही अतिरिक्त कार्यभार
आता भरीत भर म्हणून खाजगी प्राथमिक शाळांचा अतिरिक्त कार्यभारही अधीक्षक शिखरे यांच्याकडे आला आहे. जिल्ह्यात ९१ खाजगी प्राथमिक शाळा असून कर्मचारी संख्या साडेसहाशेच्या घरात आहे. या गोष्टी लक्षात घेता शासनाने गतिमान कारभारासाठी अशा अधिकाऱ्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.