सातारा : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ मध्ये निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेडच्या नजीकच्या केंद्रावर मूग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी दि. ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी मूग खरेदीसाठी रु. ८०७८ प्रति क्विंटल, उडीद खरेदीसाठी ७८०० प्रति क्विंटल व सोयाबीन खरेदीसाठी रु.५३२८ प्रति क्विंटल खरेदीकरीता आधारभूत दर निश्चित केले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.
हंगाम २०२५-२६ मध्ये सातारा जिल्ह्यात फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड फलटण, वाई तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड वाई, कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड कराड, मसुर नं.२ विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड.का.से.सह. सोसायटी लि. मसुर, कोरेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड कोरेगाव येथे नाफेडने खरेदी केंद्रे निश्चित केली आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मुग, उडिद, व सोयाबीन विक्रीसाठी आपल्या गावाजवळील नाफेडच्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जाऊन ७/१२ उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवून प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने पीओएस मशिनव्दारे करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, चालु वर्षाचा ७/१२ उतारा पीकपेरा इ. कागदपत्रांसह नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी धान्य वाळवून, स्वच्छ करून काडीकचरा नसलेले, आद्रता १२% च्या आत असलेले विक्रीसाठी आणणे अनिवार्य आहे. तसेच खरेदीकरीता आपणास मेसेज प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा. असेही आवाहन श्री. सुद्रिक यांनी केले आहे.