इंदोली-पाल उपसा सिंचनला तत्त्वतः मान्यता

आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश

by Team Satara Today | published on : 29 April 2025


उंब्रज : इंदोली-पाल उपसा सिंचन योजनेस ५० मीटर वरून १०० मीटर हेडवर पाणी आरक्षण मिळण्यासाठी प्रस्तावास आज तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील इंदोली, पाल विभागाचा दुष्काळ संपणार आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

चोरे परिसरातील  इंदोली, पाल परिसरातील शेतकऱ्यांसाठी  वरदायनी ठरणाऱ्या इंदोली व  पाल  उपसा  सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. महामंडळाच्या संदर्भीय पत्रान्वये ५० मीटर उंचीवरील ११७० हेक्टर क्षेत्रास तारळी प्रकल्पांतर्गत पाल व इंदोली उपसा सिंचन योजनेच्या ८.४३ दशलक्ष घनमीटर बचतीच्या पाण्यातून कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता दिल्याचे पत्र २८ एप्रिलला कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आमदार घोरपडे यांनी योजनेंतर्गत येणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन या योजनांची पाहणी केली, तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून नेमकी अडचण जाणून घेतली.

दरम्यान, दुष्काळाची तीव्रता पाहता व स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. तारळी प्रकल्पामध्ये  पाल  व  इंदोली  उपसा  सिंचन योजनेचा समावेश होत असून, इंदोली  व  पाल  उपसा  सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील तारळी सिंचन योजनेच्या अंतर्गत  पाल, चोरे, धावरवाडी, रताळवाडी, चोरजवाडी व मरळीसह इतर गावांमधील एकूण १९७० हेक्टर क्षेत्रास पाणी मिळणार आहे, तसेच  इंदोली  उपसा सिंचन योजनेंतर्गत इंदोली, वडगांव, गोडवाडी, अंधारवाडी, साबळवाडी व कोरिवळेचा काही भाग या गावातील एकूण शेकडो हेक्टर क्षेत्रास पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाल- इंदोली उपसा सिंचन योजनेचे पाणी शिवारात खिळणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बाल विवाह केल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
काश्मीरच्या पर्यटकांची पावले वळली मिनी काश्मीरकडे !

संबंधित बातम्या