७० वर्षांनंतर खेड बुद्रुकमधील रस्ता पोलिस बंदोबस्तात खुला

by Team Satara Today | published on : 20 March 2025


लोणंद : देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत गेली ७० वर्षे रस्त्यापासून वंचित असलेल्या खेड बुद्रुक (ता. खंडाळा) येथील व्हटकरमळा वस्तीकडे जाणारा रस्ता अखेर खेड बुद्रुक ग्रामपंचायत, माजी सरपंच गणेश धायगुडे - पाटील व त्यांचे सहकारी, ग्रामस्थ व महसूल प्रशासनाच्या वतीने काल पोलिस बंदोबस्तात खुला करण्यात आला. व्हटकरमळा वस्तीला हक्काचा रस्ता मिळाल्याने तेथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

खेड बुद्रुक गावापासून पूर्वेकडे दोन किलोमीटर अंतरावर ३०० लोकसंख्या व्हटकरमळा वस्ती आहे. वस्तीकडे जा- ये करण्यासाठी रस्ताच नव्हता. पायवाटही लगतच्या स्थानिक शेतकऱ्यांनी अडवल्याने तेथील ग्रामस्थांची ससेहोलपट सुरू होती. मात्र, ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्ता खुला करण्यात यश मिळविले.

वस्तीवरील ग्रामस्थांना काट्याकुट्यातून वाट काढत यावे लागत होते. पावसाळ्यात तर चिखल तुडवत ये- जा करावी लागत होती. या प्रलंबित रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी सरपंच गणेश धायगुडे - पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, मंत्री मकरंद पाटील यांनी रस्त्यासाठी ४० लाखांचा निधीही मंजूर केला. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू करताना लगतच्या शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे काम खोळंबले होते.

खेड बुद्रुक ग्रामपंचायतीने हा रस्ता खुला करण्याबाबत तहसीलदारांकडे धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन हा रस्ता खुला करण्याचे आदेश देण्यात आल्याने पोलिस बंदोबस्तात रस्ता खुला करण्यात आला. खंडाळ्याचे महसूल नायब तहसीलदार चेतन मोरे यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून रस्ता मोकळा केला.

यासाठी नायब तहसीलदार चेतन मोरे, खंडाळा भूमिअभिलेख विभागाचे नितीन पवार, लोणंदच्या मंडल अधिकारी रूपाली यादव, ग्राम महसूल अधिकारी विना पुंडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी यादव, महसूल सेवक राजेंद्र व्हटकर, पोलिस पाटील रोहिदास जमदाडे, पोलिस हवालदार रामदास शेळके, हरिश्चंद्र सोनवलकर, माजी सरपंच गणेश धायगुडे- पाटील, सरपंच सुभाष ठोंबरे, बाजार समितीचे संचालक नारायणराव धायगुडे- पाटील, उमाताई रासकर यांचे सहकार्य लाभले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक नाही तर ‘या’ पेयाचे सेवन ठरेल फायदेशीर
पुढील बातमी
आदित्य ठाकरेंचे रिया चक्रवर्तीला ४४ कॉल

संबंधित बातम्या