सातारा : शौर्याच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या आगळ्या मोटारसायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मध्य प्रदेशातील सागर रेजिमेंट सेंटर येथून सुरू झालेल्या या मोहिमेचा लष्करी परंपरा जोपासणाऱ्या अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) गावात समारोप झाला.
लेफ्टनंट कर्नल सौरभ हून यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आयोजिण्यात आली. त्यात मेजर अर्चना सिंह, लेफ्टनंट कर्नल धीरज जसरोटिया, सुभेदार ए. बर्जिन शिबू, नायब सुभेदार समरेंद्र सुंदराय, नायब सुभेदार वी. वी. एस. गुप्ताजी, हवालदार तिल्स कृष्णा, नाईक टी. आर. एल. रेड्डी, नाईक राजू कुमार, नाईक ओमपाल सिंह, लान्स नाईक सी. पी. थंगकोया, लान्स नाईक एस. अनुप, एन. मणी, लान्स नाईक दीपक कुमार या सैन्यवीरांचा समावेश होता.
भारत व पाकिस्तान यांच्यातील युद्धाची हीरक जयंती अन् महू येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा स्थापना दिवस यांचे औचित्य साधून ही अनोखी मोटारसायकल मोहीम आयोजिण्यात आली. या वेळी अपशिंगे मिलिटरी ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, तसेच आजी- माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. ‘एएमओ’चे अध्यक्ष महादेव निकम, कोषाध्यक्ष सुभेदार सुधीर करांडे यांनी भेटीचे नियोजन केले. ही मोटारसायकल मोहीम आधुनिक युद्ध कौशल्यांच्या प्रेरणादायी परंपरेची आठवण देणारी ठरली.
या मोटारसायकल मोहिमेचा हेतू लष्करी परंपरेचे मूल्य वाढविणे अन् देशाप्रती मूलभूत कर्तव्यभावना जोपासणे हा होता. हे केवळ साहसाचे प्रदर्शन नव्हे, तर गतस्मृतींना, वीरांच्या शौर्याला अन् वचनबद्धतेला सजीव करणारे एक जिवंत चित्र होते.
- लेफ्टनंट कर्नल सौरभ हून