उन्हाळ्यांत फुलंझाडांची काळजी कशी घ्यावी?

by Team Satara Today | published on : 19 April 2025


कडाक्याचा उन्हाळा अगदी सगळ्यांनाच नकोसा वाटतो. प्राणी, पक्षी, झाडं, मानव अशा सर्वांनाच हा ऋतू अगदी हैराण करतो. रणरणत्या उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. याचबरोबर, आपल्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये लावलेल्या रोपांची देखील उन्हाळ्यात तितकीच काळजी घेतली पाहिजे. शक्यतो उन्हाळ्यात आपल्या बागेतील किंवा गार्डनमधील रोपं उष्णतेमुळे कोमेजून जातात. यातही जर फुलझाडं असेल तर त्या नाजूक रोपांची अगदी लहान मुलांप्रमाणेच काळजी घेणे आवश्यक असते.

कडाक्याच्या उन्हामुळे फुलझाडं आणि त्यावर फुललेली सुंदर, नाजूक फुलं देखील उन्हांत भाजून निघतात. प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे बाल्कनीतील इतर रोपांच्या तुलनेत फुलझाडं अगदी पटकन कोमेजतात. यासाठीच उन्हाळ्यात फुलझाडांची विशेष काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवूयात. 

उन्हाळ्यांत फुलंझाडांची काळजी कशी घ्यावी ? 

१. पाणी :- उन्हाळ्यांत फुलझाडांना टवटवीत ठेवण्यासाठी त्यांना पाणी देण्याच्या योग्य वेळा पाळल्या पाहिजेत. रोपांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरच पाणी द्यावे. थोडे - थोडे पण खोलवर पाणी द्यावे, यामुळे रोपांची मूळ दीर्घकाळ ओलसर रहातील. उन्हाळ्यात फुलझाडांना रोज पाणी द्यावे तसेच कुंडीतील ओलसरपणा टिकतो की नाही ते देखील तपासून पाहावे. 

२. सूर्यप्रकाशापासून बचाव :- कुंडीतील फुलझाडांना थेट सूर्यप्रकाश लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावीत. गच्चीवर किंवा गार्डनमध्ये फुलझाडं असल्यास छत्री, ग्रीन नेट किंवा सावलीत ठेवावीत. जमिनीत रुजलेल्या झाडांभोवती पेंढा, कोरडे गवत किंवा कोकोपीट टाका. जेणेकरून माती थंड राहील. 

३. खते :- उन्हाळ्यात खूप जास्त रासायनिक खतांचा वापर करु नका. घरगुती कंपोस्ट खत, गांडूळखत वापरणे अधिक फायदेशीर ठरेल. उन्हाळ्यात रोपांची वाढ थोडी कमीच होते त्यामुळे खतांचे प्रमाण देखील कमीच ठेवा. 

४. रोपांची निगा राखा :- सुकलेली पाने, फुले काढून टाका, यामुळे रोप टवटवीत राहण्यास अधिक मदत होते. उन्हाळ्यात काही फुलझाडांवर कीड लागते, त्यामुळे दर ८ ते १० दिवसांनी निरीक्षण करा आणि नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करा. 

५. पाण्याची फवारणी :- उन्हाळ्यात, आठवड्यातून एकदा फुलझाडांवर हलकी पाण्याची फवारणी करा. यामुळे पानांवरील धूळ निघून जाऊन पाने ताजीतवानी होतात. गुलाब, झेंडू, मोगरा यांसारखी फुलझाडं उन्हाळ्यातही खूप सुंदर फूलं देतात फक्त त्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नवी दिल्लीत चार मजली इमारत कोसळली
पुढील बातमी
'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्याच्या दिर्घांक नाटकाची नाट्यप्रेमींना भुरळ

संबंधित बातम्या