राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राष्ट्रवादीचा गड सावरण्यासाठी खुद्द सुनेत्रावहिनी पवार मैदानात

by Team Satara Today | published on : 31 January 2026


मुंबई  : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

राज्याचे लाडके नेतृत्व अजितदादा पवार यांच्या एक्झिटने महाराष्ट्र हळहळत असतानाच, आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. 'दादां'चे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि राष्ट्रवादीचा गड सावरण्यासाठी आता खुद्द सुनेत्रावहिनी पवार मैदानात उतरल्या आहेत. आज (दि. ३१) सायंकाळी अत्यंत साध्या पण भावूक वातावरणात सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. ​राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावलेले होते.

​अजितदादांच्या अस्थिविसर्जनानंतर शुक्रवारी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी (सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल) थेट 'वर्षा' बंगला गाठला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या खलबतांनंतर सुनेत्रावहिनींच्या नावाला पसंती दर्शवण्यात आली. शनिवारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आणि आज सायंकाळी हा ऐतिहासिक शपथविधी पार पडला.

​आज लोकभवन येथे झालेल्या या शपथविधीला दु:खाची मोठी झालर होती. त्यामुळे समर्थकांना फुले, हार किंवा पुष्पगुच्छ न आणण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या होत्या. अजितदादांच्या आठवणीने गलबललेल्या वातावरणात सुनेत्रावहिनींनी ही मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली.

एकिकडे वहिनी शपथ घेत असताना दुसरीकडे बारामतीकर मात्र संभ्रमात होते. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नव्हते. "मला याबाबत काहीच कल्पना नाही," असे सांगत त्यांनी हात झटकले. तर सुप्रिया सुळे यांनी दुपारी काटेवाडीत जाऊन काकींची (अजितदादांच्या मातोश्रींची) भेट घेतली आणि थेट दिल्लीला रवाना झाल्या. पवार कुटुंबातील ही दुरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

​पंतप्रधानांकडून खास शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सुनेत्रा पवारांचे अभिनंदन केले आहे. "महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवारजी राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करतील," अशा शब्दांत मोदींनी विश्वास व्यक्त केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड शहर परिसरात वाघ दिसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; नागरिकांमध्ये घबराट पण ‘एआय’च्या फोटो तयार करून व्हायरल केल्याचे निष्पन्न
पुढील बातमी
लोणंद रेल्वे स्थानकाजवळ राईड मारून येतो असे सांगून मोटरसायकल लांबवली

संबंधित बातम्या