सातारा : जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या गणांसाठी आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबरला काढली जाणार असून, त्यावरील हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण ३१ ऑक्टोबरला निश्चित केले जाणार आहे.
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता जागा निश्चित करण्यासाठी प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांकडे सहा ऑक्टोबरपर्यंत पाठविले जाणार आहेत.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास आठ ऑक्टोबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबरला काढली जाईल.
प्रारूप आरक्षणाची अधिसूचना १४ ऑक्टोबर प्रसिद्ध केली जाईल. जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना १४ ते १७ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहेत. प्राप्त प्रारूप आरक्षणावरील हरकती व सूचनांच्या आधारे अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्तांना २७ ऑक्टोबरपर्यंत सादर केला जाईल. प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून आरक्षण अंतिम करणे ३१ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करणे व अंतिम आरक्षण शासन राजपत्रात तीन नोव्हेंबरला प्रसिद्ध केले जाणार आहे.