सातारा : शाहूनगर येथील परिसराला रस्त्यासारख्या पायाभूत सुविधाही मिळत नाहीत, या घटनेच्या निषेधार्थ येथील रहिवासी सनी रमेश भिसे या युवकाने रस्त्यावर बसून खड्ड्यातील पाण्याने अंघोळ केली. सातारा पालिकेने शाहूनगर मध्ये राहणार्या नागरिकांकडे तत्काळ लक्ष द्यावे अन्यथा यापुढे याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सनी भिसे यांचा शाहू नगरातील रस्त्यांसाठी पालिकेकडे वारंवार पाठपुरावा सुरू होता. मात्र सातारा पालिकेकडे ठेकेदाराची यंत्रणा अपुरी असल्यामुळे काम होऊ शकत नसल्याचा खुलासा करण्यात आला होता. त्याचबरोबर अवकाळी येणार्या पावसाची ही अडचण होती. सातारा पालिका वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप भिसे यांनी करत शाहू नगरातील गुरुकृपा कॉलनीतील रस्त्यावर खड्ड्यांमध्ये बसून तेथील पाण्याने अंघोळ केली. यावेळी परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. सातार्यात रस्ते होत नसल्याचा निषेध भिसे यांनी वेगळ्या पद्धतीने केल्याने दिवसभर समाज माध्यमांवर या आंदोलनाची चर्चा होती.
सातारा शहर पोलिसांनी या आंदोलनाचे दखल घेत भिसे यांची समजूत काढली. या आंदोलनाची माहिती सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाला देण्यात आली. बांधकाम विभागाच्या सूत्रांनी या रस्त्यासाठी 90 लाख रुपयाची निविदा काढण्यात आली असून या रस्त्याचे काम 15 ऑक्टोबर च्या नंतर लगेच सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले.