सातारा : दि. 25 सप्टेंबर रोजी कोयनानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आलेल्या तरुणीच्या मृतदेहाच्या घटनेचा उलगडा कोयनानगर पोलिसांनी केला असून याप्रकरणी ज्ञानदेव तुकाराम सुतार (वय 35, रा. तळीये पश्चिम, ता. पाटण) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या हा संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पाटण तालुक्यातील कोयनानगर पोलीस ठाण्याच्या दक्ष तपासामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवणार्या खुनाच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी कोयनानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठाण्याच्या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक चौकशीत हा मृत्यू नैसर्गिक नसून थेट खून असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर गुन्हा रजिस्टर क्रमांक 314/2025 अन्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास पथक स्थापन करण्यात आले. घटनास्थळी मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांचे बारकाईने परीक्षण, गुप्त माहितीचा वापर आणि सातत्यपूर्ण तपास यामुळे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध लावला. अखेर ज्ञानदेव तुकाराम सुतार याला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
या कारवाईसाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. के. ओलेकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ जाधव, पो.ह.कॉ. ओंकार जाधव, पो.ह.कॉ. शिंगाडे यांच्यासह तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच या प्रकरणाच्या उलगड्यात संतोष गायकवाड, सागर गुळगुळ, मनोहर महाडिक, सनी आटो, विजय महाडिक, राजेंद्र नाटे, अशोक निकम आणि सुनील शेख या जवानांनी परिश्रम घेतले.
या थरारक प्रकरणाचा उलगडा झाल्याने नागरिकांत दिलासा व्यक्त होत असून, कोयनानगर पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.