सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या 68 शाळांमध्ये पहिली ते चौथीला पाचवी आणि 5 शाळातील पाचवी ते सातवीला आठवीचा वर्ग नव्याने जोडण्यात आला आहे. तर कोडोली ता. सातारा व कोळेवाडी ता. कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना नववीचा वर्ग सुरु करण्यात आला आहे. झेडपीच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात असलेल्या खासगी शाळांना चाप बसला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वर्गाचा आकृतीबंध पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी असा आहे. मात्र राज्यात हा आकृतीबंध पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी असा आहे. प्राथमिक शिक्षणाची सुविधा गावातच असावी असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमुद आहे. त्यानुसार बदल केले जात आहेत. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पटसंख्या तसेच पहिली ते चौथी तर सहावी व सातवीमध्ये शिकणार्या बालकांबाबत वस्तीनजीकच्या 1 किलोमीटर व 3 किलोमीटर अंतरापेक्षा जास्त अंतर चालत जाण्यायोग्य असणार्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेस पाचवी व आठवीचा वर्ग जोडण्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना अधिकारी दिले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यात 68 शाळांमध्ये पहिली ते चौथीला पाचवी आणि 5 शाळातील पाचवी ते सातवीला आठवीचा वर्ग नव्याने जोडण्यात आला आहे.
कोडोली ता. सातारा व कोळेवाडी ता. कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना नववीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावात उच्च प्राथमिक शिक्षण घेण्याची सोय झाली आहे. त्यामुळे खासगी संस्थांकडे जाणारा मुलांचा ओढा थांबून तो आता प्राथमिक शाळेकडे वळला आहे.
पाचवी व आठवीचे वर्ग जिल्हा परिषद शाळांना जोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच उच्च प्राथमिक शिक्षण घेता येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा