अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी; जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला, गुणवत्ता मुल्यांकनात अव्वल क्रमांक

by Team Satara Today | published on : 25 February 2026


सातारा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) मार्फत राबविण्यात येणाऱ्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत राज्यभरात करण्यात आलेल्या बाह्य मूल्यांकनात सातारा जिल्ह्यातील १७ शाळांना मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनामध्ये अण्णासाहेब कल्याणी विद्यालय या विद्यालयाने A+ श्रेणी मिळवत जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला आहे.

SQAAF अंतर्गत शाळांची स्व-मूल्यांकन प्रक्रिया, त्यानंतर तज्ज्ञांकडून बाह्य मूल्यांकन आणि गुणवत्तेच्या निकषांवर आधारित श्रेणी निश्चिती अशा टप्प्यांतून ही प्रक्रिया राबविण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता, व्यवस्थापन कार्यक्षमता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा व शालेय वातावरण या विविध घटकांच्या आधारे शाळांचे मूल्यमापन करण्यात आले.

या अभिमानास्पद यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा गौरव राज्यस्तरावर अधोरेखित झाला आहे. यावेळी मा. मुख्याध्यापक बी. एन. पवार साहेब यांचा डॉ अनिल पाटील साहेब यांनी बुके देऊन  सत्कार केला आपल्या मनोगतात डॉ. अनिल पाटील साहेबांनी सर्वांचे कौतुक तर केलेच पण त्याबरोबर भविष्यासाठी दिशाही दिली. याप्रसंगी आपल्या मनोगतात मुख्याध्यापक बी. एन. पवार साहेब यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी , विद्यालयाचे उपमुख्याध्यापक, दोन्ही पर्यवेक्षक ,सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे योगदान हेच या यशाचे खरे श्रेय असल्याचे नमूद केले. विद्यालयाच्या प्रगतीचा हा सुवर्णक्षण पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या यशामुळे संपूर्ण शैक्षणिक परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही गुणवत्ता आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा ध्यास कायम ठेवण्याचा निर्धार विद्यालयाने व्यक्त केला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.शशिकला घोरपडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.उपेंद्र घाडगे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मान.श्री.प्रशांत पाटील,मान.डॉ.राजेंद्र मोरे साहेब ऑडिटर रयत शिक्षण संस्था,तसेच सहायक विभागीय अधिकारी मान.एन टी निकम साहेब यांची उपस्थिती होती.सूत्रसंचलन सौ.बर्गे एस एस यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक; निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन
पुढील बातमी
वाढे येथून डीपीमधून ८० किलो तांब्याची तारेची चोरी

संबंधित बातम्या