हॉस्पिटलमधील मोबाईल चोरटा चार तासात जेरबंद

सातारा शहर पोलिसांची कामगिरी

by Team Satara Today | published on : 07 February 2025


सातारा : सातार्‍यातील सिटी हॉस्पिटलमध्ये केअरटेकर बनून मोबाईलची चोरी करणार्‍या अतुल विलास ठोंबरे वय 22 रा. झेडपी कॉलनी, शाहूपुरी, याला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या चार तासात जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल व मोटरसायकल असा 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 7 फेब्रुवारी रोजी शनिवार पेठेतील सिटी हॉस्पिटल मध्ये महत्त्वाचा डाटा असलेला एक मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद हॉस्पिटलचे मॅनेजर यांनी नोंदवली होती. विषय गंभीर असल्याने सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही द्वारे माहिती घेतली आणि एका संशयित युवकाची बातमीदारा मार्फत ओळख पटवण्यात आली. सदर युवकाचा सातारा शोध घेत असताना तो राजवाडा परिसरात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने हॉस्पिटलमध्ये मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले. यापूर्वीही या इसमाने केअर टेकर बनून वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, निलेश यादव  सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी सहभाग घेतला होता. या तपासाचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कौतुक केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जकातवाडीतील राड्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा
पुढील बातमी
लोणंद येथे दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या