पाचगणी : पाचवड मार्गावर मेढा आगाराच्या बसचा खेळखंडोबा चालू असून बस वेळेवर न येणे, फेऱ्या अचानक रद्द करणे, असलेल्या बस बंद करणे, पुरेशा बस न सोडणे, आलेल्या गाड्या वेळेवर न येणे यामुळे प्रवासीवर्गाचे हाल चालू आहेत. महिला, विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याने आज संतप्त महिलांनी काटवली बस थांब्यावर दोन तास रास्ता रोको केला. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती.
सकाळी काटवली बसस्थानकावर अनेक महिला प्रवासी आणि विद्यार्थी तसेच नागरिक जमा झाले होते. पाचगणीहून येणाऱ्या गाड्या आणि पाचवडहून येणाऱ्या गाड्या अचानक सर्वांनी रस्त्यावर बसून थांबवल्या. यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. सर्वांनी मिळून काटवली येथे ठिय्या मांडला.
या विभागातून बरेच लोक, महिला चाकरमाने पाचगणीत नोकरीधंद्यानिमित जात असतात. मात्र, या गाड्या अचानक रद्द होतात. कुठे मोठी यात्रा असली की या गाड्या येतच नाहीत. त्यामुळे अडचण निर्माण होते. तर विद्यार्थी अडचणीत येतात. त्यांना घरी जावे लागते. त्यामुळे आजचा उद्रेक दिसून आला. संतप्त झालेल्या महिलाना अनेकजण समजावत होते. मात्र त्या कुणाचेही ऐकायला तयार नव्हत्या. अखेर या आलेल्या गाड्यांच्या चालक, वाहकांना तक्रारी या आंदोलकांनी सांगितल्या.
शेवटी निवेदन मेढा आगाराच्या चालक वाहकांना दिले. आगारप्रमुखांशी फोनवर संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही यावर सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू करू, अशी ग्वाही दिल्यानंतर प्रवासी शांत झाले. या निवेदनावर संपत गोळे, सुनंदा गायकवाड, सुरेखा कांबळे, प्रगती गायकवाड, शकर दुर्गावळे, ताराबाई पवार, सविता सुर्वे, मंगल वन्ने , वनिता कदम यांचेसह सुमारे ५० प्रवाशांच्या सह्या आहेत.