सातारा : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा व आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सातारा यांच्या संयुक्त विदयमाने गावपतळीवरील गंभीर आजाराने ग्रस्त दीर्घकालीन वेदना सहन करणारे आणि अंथरुणाला खिळून असलेले रुग्ण यांना सर्वसामावेशक आणि सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा पॅलिएटिव्ह केअर समितीची स्थापन करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांच्या वेदना आणि लक्षणे कमी करून जीवनमानाचा दर्जा सुधारणारी विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे.
पॅलिएटिव्ह केअर (उपशामक काळजी ही गंभीर किंवा जीवघेण्या आजाराने ग्रस्त रुग्णांचे आयुष्यमान न वाढवता, त्यांच्या वेदना आणि लक्षणे कमी करून जीवनमानाचा दर्जा सुधारणारी विशेष वैद्यकीय सेवा आहे हे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आधारित देते, ज्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना तणावातून दिलासा मिळतो. कर्करोग हृदयविकार फुफुसाचे आजार किडनी निकामी होणे किंवा इतर कोणत्याही गंभीर आजाराच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही वयात ही सेवा घेता येते.
संभाव्य पॉलिएटिव्ह रुग्ण
कर्करोगाचे प्रगत टप्प्यातील रुग्ण, अंतिम टप्प्यातील मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुस निकामी झाली रुग्ण, पक्षाघातानंतर कायमस्वरूपी अपंगत्व आलेले रुग्ण, न्यूरोलॉजिकल आजार, दीर्घकाळ मानसिक आजार असलेले रुग्णा, दीर्घकाळ अंथरुणावर असलेले रुग्ण, एचआयव्ही व टीवी चे प्रगत टप्प्यातील रुग्ण, गंभीर जन्मजात आजार असलेली मुलं यांचे सर्वेक्षणावेळी तीव्र वेदना, मध्यम वेदना व सौम्य वेदना अशा गटात सर्वेक्षण होणार आहे.
गावोगावी आता सर्व्हेक्षण होणार
"प्रत्येक गाव, वॉर्ड पातळीवर घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षण करताना दीर्घकालीन आजार अंथरुणावर खिळलेले रुग्ण, कर्करोग व असाध्य आजार असलेले रुग्ण यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्या संदर्भातील सर्वेक्षण जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. रुग्णांच्या आजाराच्या वर्गीकरणानुसार भेटीचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे. तसेच गृहभेटीची नोंद रजिस्टर मध्ये करण्यात येणार आहे. तीव्र वेदना असलेल्या रुग्णांच्या घरी आठवड्यातून किमान एक वेळा, मध्यम वेदना असलेल्या रुग्णांच्या घरी पंधरा दिवसातून एक वेळा तर कमी त्रास असलेल्या रुग्णांच्या घरी महिन्यातून एक वेळा आरोग्य कर्मचारी भेट देणार आहे."