सातारा : चिमणगाव, ता. कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिलने अद्याप ऊस दराची घोषणा न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठाम भूमिका घेतली आहे. जोपर्यंत ऊस दर घोषित केला जात नाही, तोपर्यंत एक कांडाही गाळपासाठी कारखान्यात जाऊ देणार नाही, असा इशारा राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.
राज्य सरकारकडून अधिकृत परवाना अद्याप मिळाला नसतानाही जरंडेश्वर शुगर मिलने गळीत हंगामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत असून त्यास शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसाच्या गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत, काही गाड्या दोन-दोन दिवस रस्त्यावरच उभ्या राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनिल पवार, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, युवा प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, खटाव तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते. वर्धनगड घाटाच्या पायथ्याशी जरंडेश्वर शुगर मिलच्या शेती अधिकाऱ्यांना आणि इतर प्रतिनिधींना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी समक्ष भेटून जाब विचारला.
अनिल पवार म्हणाले, जेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी या महामार्गावर आंदोलन करतो, तेव्हा कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी कारखान्याच्या दबावाखाली येऊन जागे होतात. शेतकरी हितासाठी आंदोलन करत असताना, कोणताही गुन्हा करत नसताना निष्कारण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. आता कारखाना प्रशासनाने नियमभंग केला, तेव्हा कोरेगावचे पोलीस निरीक्षक कुठे होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.