सातारा : दसऱ्याच्या मुहुर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावर जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सवानिमित खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रतापगडावर भवानीमातेची पूजा पारंपारिक व विधिवत पद्धतीने करण्यात आली. दरवर्षी नवरात्रोत्सवात प्रतापगडावर उदयनराजे सहकुटुंब भवानीमातेची पूजा करतात.
दरम्यान, उदयनराजेंच्या हस्ते भवानी मातेची आरती घेण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी गडावर मोठी गर्दी केली होती. सकाळी खासदार उदयनराजे भोसले हे गडावर आले तेव्हा त्यांचं स्वागत तुतारीच्या निनादात करण्यात आले. उदयनराजेंच्या हस्ते पूजा झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पूरग्रस्तांना आर्थिक संकटातून सावरण्याचे बळ मिळावे असे साकडे भवानी मातेला घातल्याचे त्यांनी सांगितले .उदयनराजे पुढे म्हणाले महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीने नुकसान झाले आहे या पूरग्रस्तांना मदत करणे ही सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळेच आम्ही यंदाचा साताऱ्याचा शाही दसरा साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले असून आम्ही यथाशक्ती मदत करणार आहोत तसेच सर्वांनीच पूरग्रस्तांना जगण्याचे बळ देऊन त्यांना सढळ हाताने मदत करावी असे आवाहन उदयनराजे यांनी यावेळी केले
यावेळी खासदार उदयनराजेंनी पूरग्रस्त लोकांना आपत्तीपासून वाचायचं असेल तर सरकारने मदतीची प्रक्रिया सुरु केली आहे तसेच आपणही सर्वांनी त्यांना सढळ हाताने मदत करण्याचा सल्ला दिला.