महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गावामध्ये आता स्ट्रॉबेरी बरोबर लाल रंगाची नाविन्यपूर्ण राजबेरी आपणास चवीसाठी मिळणार आहे या राजबेरी चे वैशिष्ट्य म्हणजे याचा रंग लाल भडक असून यामध्ये हाय अँटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात असल्यामुळे आरोग्यास पोषक अशी चांगली समजली जाणारी ही रासबेरी आहे. अशा या फळाची लागवड या वर्षापासून भिलार गावी नुकतीच करण्यात आली,
भिलार हे पुस्तकाचे गाव व स्ट्रॉबेरी साठी प्रसिद्ध आहे या गावांमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले जातात जसे की भारतातले पहिले पुस्तकाचे गाव, स्ट्रॉबेरी चे गाव ,स्ट्रॉबेरी पासून वाईन बनवणे असे अनेक प्रयोग या गावांमध्ये केले गेले आहेत. त्यातच एक नवीन प्रयोग म्हणून या गावातील शेतकरी विश्वनाथ भिलारे यांनी लाल भडक रंगाची राजबेरी या पिकाची लागवड करून चांगले दर्जेदार उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. भिलारच्या मातीत सन 1992 पासून कै बाळासाहेब भिलारे दादा यांच्या माध्यमातून स्टोबेरीची लागवड सुरु झाली.सन 2024 - 2025 पासून भिलार मातीमध्ये नितीन दादा भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली लाल भडक रंगाची राजबेरीची लागवड विश्वनाथ भिलारे या तरुण शेतकऱ्यांनी केली. यावर्षी श्रीराम विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून विश्वनाथ भिलारे यांनी माती परीक्षण करून राजबेरीसाठी आवश्यक घटक आहेत की नाही याची पडताळणी केली. अनुकूल असे माती परीक्षण झाल्यानंतर सुनील नानासाहेब भिलारे यांच्या माध्यमातून रेड राजबेरी पिकाचा यशस्वी प्रयोग केला आहे.
या लाल भडक राजबेरी या फळा ला चांगली बाजारपेठेत मागणी असून प्रति किलो 2000 ते 3000 रुपये दर मिळत आहे . या फळाचे पहिले उत्पादन ग्रामदैवत जननी माता यांच्या चरणी अर्पण करून दुसरी फळाची पेटी नितीन भिलारे यांच्या हस्ते मंत्री मकरंद पाटील यांना देण्यात आली.
ह्या फळाच्या यशस्वी प्रयोगाबाबत बोलताना नितीन भिलारे म्हणाले, महाबळेश्वर तालुक्यातील मुख्य पीक म्हणजे स्टोबेरी आहे. पण सध्या संपूर्ण देशामध्ये स्टोबेरीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होत आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून महाबळेश्वर भिलारमधील शेतकऱ्यांनी आता रासबेरी व मलबेररीच्या वेगवेगळ्या जातींची लागवड करण्यास सुरुवात करावी.