सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून अभ्यासुवृत्ती ,नम्रता तसेच समाजाविषयी नितांत तळमळ आणि प्रेम हे गुण विद्यार्थ्यांसह संपूर्ण समाजानेच आत्मसात करणे गरजेचे आहे. विविध समस्यांना, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि स्वतःचे जीवन सफल बनवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार अनमोल आहेत",असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते, खटाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
कोडोली येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी सूर्यकांत देशमुख, गणेश शेलार, जयश्री गाडेकर ,प्रणिता चव्हाण हे शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांचे मार्गदर्शन मिळाले.
श्री क्षीरसागर यावेळी म्हणाले,"बाबासाहेबांनी खूप संघर्ष केला .समाजासाठी ते शेवटपर्यंत झटले. अत्यंत विपरीत परिस्थितीत सुद्धा हार न मानता विद्यार्थी दशेपासून त्यांनी रोज १८ तास अभ्यास करून स्वतःला घडविले. या विद्वत्तेचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजासाठी केला. विविध प्रकारच्या ३५ पदव्या मिळवूनही ते आयुष्यभर नम्र राहिले. संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी त्यांचा स्नेह खूप होता. हे सर्वच महान समाजसुधारक होते. विद्यार्थ्यांनी चांगल्या शालेय गुणांसह नम्रता अंगी बाळगावी. केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे तर संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची आहे.गोरगरीब, वंचित, पीडित यांच्यासाठी काहीतरी करण्याची जिद्द असायला हवी. विद्यार्थ्यांनी गरिबीसारखी कोणतीही अडचण लक्षात न घेता कष्ट करीत रहावे. मार्गदर्शन मिळत राहते .बाबासाहेबांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच ;महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे आशीर्वाद मिळाले. मनुस्मृति दहन असो की चवदार तळे सत्याग्रह असो त्यांनी प्रचंड काम केले. तब्बल दोन वर्षे 11 महिने 18 दिवस एवढे रात्रंदिवस कष्ट करून भारतासाठी राज्यघटना लिहिली. हे त्यांचे कार्य अजरामर आहे.विद्यार्थी आणि समाजाने त्यांचा आदर्श घेऊन आपले ज्ञान, आपली संपत्ती याचा वापर शाळेसाठी गोरगरिबांसाठी करावा. सुशिक्षितांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे."
शिक्षक सूर्यकांत देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. गणेश शेलार यांनी आभार मानले.