खंडाळा : खंडाळा तालुक्यातील असवली या ठिकाणी एका १२ वर्षांच्या चिमुरड्यावर फटाकडा टाकल्याने पॅन्टला आग लागली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवार, १६ रोजी असवली येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी बाराच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, संबंधित जखमी मुलगा हा दुपारच्या सुमारास त्याच्या घरी जात असताना अचानकपणे दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी मुलाच्या पायावर फटाकडा टाकला. फटाकडा मोठ्याने न वाजता त्यातून अचानक केमिकलसारखा वास आला व काही समजण्याच्या आत या मुलाच्या पॅन्टला आग लागली. तोपर्यंत दुचाकीवरून आलेल्या दोघांनीही पलायन केले.
चेहऱ्यावर रुमाल बांधल्यामुळे चेहरे समजू शकले नाहीत. या छोट्या मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी येऊन आग विझवली. परंतु यामध्ये या १२ वर्षीय चिमुकल्याचा पाय गंभीररीत्या भाजला गेला आहे. या लहान मुलाला खंडाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटना घडल्यानंतर संबंधित मुलगा जळालेली पँट घेऊनच पोलिस ठाण्यात आला होता.