मुंबई : मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं हे वरती पंतप्रधानांदेखील माहिती नसेल की, खाली काय चाटूगिरी चालू आहे. हे कशातून येतं, सत्ता डोक्यात गेली की. आम्ही वाटेल ते करू. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असूदे नाहीतर आणखी काही असूदे. मला मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजे. मला सत्ता मिळाली पाहिजे", असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात ईव्हीएममद्वारे मतचोरी कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाला सर्वांनी यावे, असे आवाहनही केले.
आपला स्वाभिमान किती गहाण टाकायचा याला काही मर्यादा? मनात यांच्या विचार येतो कसा? हे एकनाथ शिंदेंचं खातं. नरेंद्र मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभाग काही ठिकाणे शोधणार आणि त्यांचे नाव असणार नमो पर्यटन केंद्र", असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.
रायगडावर. राजगडावर. म्हणजे जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे, तिथे हे आता पर्यटन केंद्र काढायला निघाले आहेत. मी आता सांगतोय, सत्ता असो, नसो. वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही. उभं केलं की फोडून टाकणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असूदे नाहीतर आणखी काही असूदे. मला मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजे. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?", असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. नमो पर्यटन केंद्राच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला गंभीर इशाराही दिला.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
