सातारा: सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा उद्घाटन समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग आणि समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या त्रिसूत्रीचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या काळात ही मूल्ये अधिक समर्पक ठरत असून शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजातील विषमता दूर करून सामाजिक न्याय प्रस्थापित करता येतो, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता संविधानिक मूल्यांची जोपासना करणारे जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रा. डॉ. जमीर मोमीन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांना उजाळा दिला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केवळ शिक्षणाच्या बळावर त्यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध दिलेला लढा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास हे गुण अंगीकारून सामाजिक समता प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी सामाजिक समतेला लोकशाहीचा पाया मानले. ही समता प्रस्थापित करणे ही केवळ शासनाचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या विचारात परिवर्तन घडवणारे माध्यम असून, समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणसंस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता आणि बांधिलकी निर्माण होते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाज परिवर्तनासाठी सक्रिय व्हावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. अर्चना पवार व प्रा. गुणकली कुलकर्णी यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. राजेंद्र सातपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले.