महाबळेश्वर तालुक्यात महाशिवरात्री भक्तिमय वातावरणात साजरी; शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी; पंचगंगा व स्वयंभू मंदिरात रांगांची शिस्तबद्ध व्यवस्था

by Team Satara Today | published on : 15 February 2026


महाबळेश्वर :  महाबळेश्वर तालुक्यात महाशिवरात्रीचा उत्सव यंदा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तालुक्यातील विविध शिवमंदिरां मध्ये पहाटेपासूनच “हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

क्षेत्र महाबळेश्वर सह पर्वत तर्फे वाघावळे येथील जोम मल्लिकार्जुन मंदिर , चकदेव श्री चौकेश्वर महादेव मंदिर, प्रसिद्ध मकरंदगड परिसरातील घोणसपूर गावात भैरी मल्लिकार्जुन मंदिर तसेच उतेश्वर्  मंदिर आणि इतर भागातील मंदिरांमध्ये हजारो शिवभक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली. जिल्ह्यातील तसेच बाहेरील भागांतून आलेल्या भाविकांनी क्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिर आणि प्राचीन स्वयंभू शिवमंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबलचक रांगा लावल्या होत्या.

विविध मंदिरातील ट्रस्ट तसेच ग्रामस्थानी मंदिर परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची आरास आणि रंगीबेरंगी सजावटीने परिसर उजळून निघाला होता. शिवपिंडीवर विविध प्रकारच्या फुलांनी आणि बेलपत्रांनी देखणी सजावट करण्यात आली होती. भाविकांनी अभिषेक, रुद्रपाठ, भजन-कीर्तन आणि नामस्मरण करून महादेवाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली. अनेक ठिकाणी दिवसभर धार्मिक कार्यक्रम, तसेच सामूहिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात  दर्शनासाठी शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावण्यात आल्या होत्या. स्वयंसेवी संस्था व स्थानिक युवक मंडळांनी भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी मोलाचे सहकार्य केले. पिण्याच्या पाण्याची व आरोग्य सेवांची ही व्यवस्था करण्यात आली होती.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाबळेश्वर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. तसेच महाबळेश्वर परिवहन मंडळाकडून अतिरिक्त बससेवेची सोय करून भाविकांना ये-जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.


       



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खोट्या बलात्कार प्रकरणाची धमकी देऊन ४० लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक; प्रेमाच्या जाळ्यात ओढून व्यावसायिकाला ब्लॅकमेल
पुढील बातमी
पाचगणी बनेल जागतिक पॅराग्लायडिंग हब उदयास येईल– खासदार नितीन पाटील; पॅराग्लायडिंग विश्वचषक २०२६ चे पाचगणीत भव्य उद्घाटन, प्रथमच भारतात स्पर्धा

संबंधित बातम्या