सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

शहरातील रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप; सदर बाजार येथे कारवर भिंत कोसळली

by Team Satara Today | published on : 21 May 2025


सातारा : अरबी समुद्र क्षेत्रात कमी दाबाचे पट्टे कायम असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहरासह वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. सुमारे दोन तास झालेल्या जोरदार पावसाने सातारकरांची दैना उडाली. 

बुधवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. सायंकाळ नंतर अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने सातारा शहर अंधारात होते. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 33.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. माण तालुक्यामध्ये वीरकर वस्ती, गंगोती येथे जर्सी गाय झाड अंगावर कोसळल्याने मृत्युमुखी पडली, तर मार्डी, तालुका माण येथे डाळिंब पिकाचे नुकसान झाले.

मान्सून या आठवड्याच्या अखेरीसच केरळमध्ये दाखल होत आहे, असा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे यंदा मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात पोहोचण्याची सुद्धा दाट चिन्हे आहेत. हवामान विभागाने येत्या 48 तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. अरबी समुद्रामध्ये वारंवार कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत असल्यामुळे सध्या अवकाळी पावसाचा तडाखा सुरू आहे. पाणी साचणे, वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक कोंडी हे पावसाळ्यात दिसणारे नियमित चित्र यंदा पूर्व मौसमी पावसाने आधीच दाखवले आहे. पुढील दोन-तीन दिवस दुपारनंतर ढगांचा गडगडाट, वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

सातारा शहरामध्ये बुधवारी दुपारी दोननंतर सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाला. पावसाच्या सरी तशा सकाळपासूनच कोसळण्यास सुरुवात झाली होती; मात्र दुपारनंतर पावसाने वेग घेतला. गोडोली येथील साईबाबा मंदिर परिसरामध्ये पुन्हा दुसर्‍या दिवशी काही घरांमध्ये व व्यावसायिकांच्या दुकानात पाणी गेल्याने त्यांचे नुकसान झाले. पालवी चौकातील भैरवनाथ सोसायटीमध्ये काही घरांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडले. सदर बाजार येथील कुरेशी गल्लीमधील घरांमध्ये पाणी शिरून दलदल तयार झाली, तर भवानी पेठ येथे राजलक्ष्मी थिएटर च्या पिछाडीला एका ठिकाणी संरक्षण भिंत कोसळून नुकसान झाले. सदर बाजार येथील कोषागार कार्यालयाच्या रस्त्यावर झाड एका कारवर कोसळून कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शाहू चौकामध्ये चार भिंतीवरून येणार्‍या पाण्यामुळे दगड गोटे तसेच सर्व राडारोडा वाहून आल्याने तेथे दलदल तयार झाली. 

सातारा पालिकेने आपत्कालीन परिस्थितीसाठी 25 कर्मचार्‍यांचे पथक तैनात केले असून त्यांना युद्ध पातळीवर कामे नेमून देण्यात आलेली आहेत. प्राधान्य क्रमाने सातार्‍यातील सात ओढ्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे ते पाणी हटवणे हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रस्त्याचा समतोलपणा हरवल्याने पाणी साचून राहत असून विसावा नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे तळ्याचे स्वरूप आले आहे. देवी कॉलनी ते साईबाबा मंदिर रस्त्यावर पहिल्याच पावसामध्ये काही ठिकाणी रस्त्याचे अस्तर उखडल्याने खड्ड्यांची यात्रा सुरू झाली आहे.

पहिल्या अवकाळी पावसाने आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडवल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पावसाने नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मार्डी, तालुका माण येथे 45 हेक्टर वरील डाळिंब पिकांचे नुकसान झाले आहे. मौजे नवलेवाडी तालुका खटाव येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसाने एका घराचे व शेडचे मोठे नुकसान झाले. माण तालुक्यातील वीरकर वस्ती येथे एका जर्सी गाईवर वादळी वार्‍याने झाड अंगावर पडून ती मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाचा आपत्ती प्रशासन विभाग पूर्णतः सज्ज असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या नुकसानीची माहिती तातडीने घेतली जात आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकार्‍यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून आपत्कालीन उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे सत्र आयोजित करण्याचे काम प्रगती पथावर आहे. त्यापूर्वीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापन दलालाच थेट कार्यानुभव घेण्याची वेळ आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्फत लाईफ जॅकेट, बोट शिवाय आपत्ती व्यवस्थापनाची इतर साधने पूरग्रस्तप्रवण क्षेत्रामध्ये पाठवण्यासंदर्भामध्ये त्या-त्या विभागाच्या तहसीलदारांना सूचित करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोट्यवधी पाण्यात; सातार्‍यातील नव्या कोर्‍या सर्किट हाऊसला गळती
पुढील बातमी
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याचा ई-मेल

संबंधित बातम्या