महात्मा फुलेंचे साहित्य श्रेष्ठ दर्जाचे - प्रा. डॉ. विजया पाटील-वाडकर ; संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत विचार मंथन

by Team Satara Today | published on : 29 November 2025


 सातारा  : थोर क्रांतिकारक, कर्ते समाज सुधारक महात्मा जोतीराव  फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे साहित्य वांग्मयीन  गुणवत्तेच्या दृष्टीने श्रेष्ठ दर्जाचे होते. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक विचार व कार्य आजही समाजाला योग्य दिशा देण्यासाठी दीपस्तंभासारखे आहेत, असे मत साहित्यिक, संशोधक प्रा. डॉ. विजया पाटील-वाडकर ( कोल्हापूर) यांनी व्यक्त केले.

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने  ' मी आणि माझे लेखन ' पुरोगामी महिला साहित्यिकांचे विचार मंथन या विषय सूत्रावर आयोजित करण्यात आलेल्या  ३९व्या वर्षातील  थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत त्या 'महात्मा फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे साहित्य ' या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे  होते. विचार मंचावर उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे, विश्वस्त  डॉ. सुवर्णा यादव व डॉ.जयपाल सावंत उपस्थित होते.

आपल्या भाषणात महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करताना डॉ. पाटील म्हणाल्या , महात्मा फुले भारतीय साहित्याचे निर्माते होते. ते  केवळ 'बोलघेवडे' सुधारक नव्हते, तर ते कर्ते सुधारक होते. तत्कालीन सुधारक जिथे मर्यादित बदलांची अपेक्षा करत होते, तिथे फुलेंनी थेट समाज परिवर्तनाचा आणि मानवी समतेचा मूलगामी विचार मांडला. त्यांनी समाजशास्त्रीय धर्म चिकित्सेतून अखंड आणि इतर गद्य पद्य प्रकारातील उत्तम गुणवत्तेची साहित्य निर्मिती केली. त्यांनी  सार्वजनिक सत्यधर्म सामाजिक नीतिमत्तेवर भर दिला.

महर्षी शिंदे उत्तम दर्जाचे संशोधक व संवेदनशील ललित लेखक होते. त्यांच्या सर्वच लेखनातून प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार होतो. कला वाणिज्य कॉलेजचे प्राध्यापक प्रकाश कांबळे यांनी ' डी कोडींग सोशल इन इक्वलिटी : ए स्टडी ऑफ डॉ. बी.आर. आंबेडकर लिटरेचर  या विषयावर पी.एच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा या समारंभात विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष  रमेश इंजे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुवर्णा यादव यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. जयपाल सावंत यांनी मानले. याप्रसंगी संबोधी प्रतिष्ठानचे संघटक व कार्यक्रमाचे निमंत्रक  दिनकर झिंब्रे, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, प्रतिष्ठानचे विश्वस्त, कार्यकर्ते  विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, सभासद,  तसेच ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, छत्रपती शिवाजी कॉलेजचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शिवाजी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
पुढील बातमी
फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली

संबंधित बातम्या