…लवकरच ग्रामपंचायत प्रशासनाचे कामकाज थेट ऑनलाइन

खंडाळा तालुक्यात वेबसाइट उपलब्ध, पंचायतराज अभियानांतर्गत उपक्रम

by Team Satara Today | published on : 06 October 2025


खंडाळा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व ६३ ग्रामपंचायतींच्या वेबसाइट्स तयार केल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच तालुक्यातील ग्रामस्थांना पारदर्शक व जबाबदार ग्रामपंचायत प्रशासनाचे कामकाज थेट ऑनलाइन पाहता येणार आहे.

याबाबत गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी सांगितले, की मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज या उपक्रमाच्या माध्यमातून खंडाळा विकास गटातील सर्वच ग्रामपंचायतींना आता स्वतंत्र वेबसाइट उपलब्ध झाली असून, त्यावर ग्रामपंचायतीची सर्वसाधारण माहिती, वितरित केल्या जाणाऱ्या सेवा, वार्षिक जमा- खर्च, हाती घेतलेली व पूर्ण झालेली कामे आदी सर्वसमावेशक माहिती उपलब्ध करण्याकामी अद्ययावतीकरणाचे काम ग्रामपंचायत केंद्र चालकांच्या माध्यमातून सध्या जोमात सुरू आहे. याद्वारे ग्रामस्थांना पारदर्शक व जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन कामकाज थेट ऑनलाइन पाहता येणार आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन (गुड गव्हर्नन्स) यासारख्या महत्त्वपूर्ण कार्यात खंडाळा विकास गटाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल अग्रेसर केले आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायत केंद्र चालक, ग्रामपंचायत अधिकारी तसेच पंचायत समितीमधील सर्व संगणक परिचारक, विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. याकामी तांत्रिक साहाय्य प्रा. मुरलीधर भूताडा आणि अभियंता सूरज शेनवडे यांनी योगदान दिले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुकास्तरीय कार्यशाळा शनिवारी (ता. चार) घेतली असून, या उपक्रमातही तालुक्याने कंबर कसली आहे. लवकरच जगात कोठेही बसून आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाइन पाहता येणे शक्य होणार आहे. याकरिता वेबसाइट अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे.

- अनिल वाघमारे, गटविकास अधिकारी.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अनुकंपा भरती झालेल्या उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
पुढील बातमी
एसटी महामंडळाच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांकडून वाढती पसंती

संबंधित बातम्या