सातारा : आमचा शेवट झाला असे म्हणणाऱ्या आमदार महेश शिंदे यांचाच राजकीय शेवट आता जवळ आला असून तो आम्ही २०२९ मध्ये करून दाखवू, असा आक्रमक इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकूणच सातारा जिल्हा परिषदेवरून राजकीय निष्ठा आणि गद्दारीच्या मुद्द्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
राजकारणात निष्ठा आणि गद्दारी याचा विचार केला तर काही लोकांनी खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाऊन गद्दारी केली आणि आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशीही गद्दारी करत आहेत. अशा गद्दारांनी आम्हाला निष्ठेचे धडे देऊ नयेत. गद्दारीचा इतिहास तुमचा आहे, आम्ही मात्र निष्ठावंत आहोत, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला आहे. आमची निष्ठा आजही शरद पवार यांच्याशी कायम आहे आणि भविष्यातही कायम राहील. त्यांचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सातारा जिल्हा हा नेहमीच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांचा जिल्हा राहिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून आ. महेश शिंदे यांच्यावर निशाणा साधत असताना आ. शशिकांत शिंदे यांनी नमूद केली की, ओबीसीसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये मूळ ओबीसी उमेदवार असतानाही स्वार्थापोटी बनावट ओबीसी दाखला मिळवून पद मिळवण्यात आले. यामुळे मूळ ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेला शब्द आम्ही पाळला. त्यांच्या पश्चातही आम्ही तोच शब्द जपला असून आम्ही निष्ठावंत आहोत. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी किमान ज्या ठिकाणी आहेत, तिथे तरी निष्ठा दाखवावी आणि ठेवावी, असा सल्ला देखील आ. शशिकांत शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांना दिला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेसंदर्भात स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, “पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या बैठकींना मी उपस्थित नव्हतो. केवळ निवडीच्या दिवशी झुंडशाहीला आळा घालण्यासाठी मी उपस्थित राहिलो होतो.
शेवटी, निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर आरोप करताना त्यांनी म्हटले की, ही निवडणूक लोकशाही पद्धतीने नव्हे, तर पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून जिंकण्यात आली. पोलीस बळाचा वापर झाला नसता, तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही पदे आमचीच झाली असती, असा दावा करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
ज्या सदस्यांनी गद्दारी केली आहे, त्यांनी नैतिकता दाखवून स्वतःहून राजीनामा द्यावा. अन्यथा जनतेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या राजीनामा निश्चितपणे घेऊ. त्यांच्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, असे आ. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.