कासवर सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी

हिल मॅरेथॉन-कासचे पर्यटक अशी दुहेरी गर्दी ; पठाराला जत्रेचे स्वरूप

by Team Satara Today | published on : 14 September 2025


सातारा,  दि.  १४ :  सातारा कास पठारावर फुलांची गालीचे मोठ्या प्रमाणावर बहरले असून हा निसर्ग सोहळा अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांनी कासकडे धाव घेतल्याने कास पठाराला पर्यटकांच्या जत्रेचे स्वरूप आले होते. आज सातारा हाफ हिल मॅरेथॉन होती. त्यामुळे हिल मॅरेथॉन आणि कासचे पर्यटक अशी दुहेरी गर्दी मोठ्या प्रमाणावर सातारा कास रस्त्यावर पाहायला मिळाली.

घाटाई फाट्यावरील पार्किंगच्या अलीकडे सातारा कडून येणारी वाहने संपूर्ण रस्ता अडवून येत असल्याने माघारी जाणाऱ्या गाड्यांना रस्ता सोडला जात नव्हता. त्यामुळे सकाळी दहानंतर या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. एकेरी वाहतुकीचा पर्याय करूनही हा पर्याय अपयशी ठरल्याचे दिसत आहे. कारण एकेरी वाहतूक फक्त कास पठार, कास तलाव ते घाटाईमार्गे पुन्हा सातारा रोडवर येत असल्याने वाहने तिथेच अडकून पडत आहेत. त्यातच घाटाईमार्गे साताऱ्याकडे जाताना घाटाई फाट्यावरील वाहनतळ असल्याने गोल फिरून वाहने सर्व एका ठिकाणी येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सध्या तरी सुटणे कठीण दिसत आहे.

कालच एकेरी वाहतुकीचे मार्ग जाहीर केले होते. मात्र, दिवसभरात खूप वाहने आल्याने पर्यटकांची वाहने पुन्हा कास तलावावरून कास पठाराकडे आल्याने पठारावर वाहतूक कोंडी झाली. घाटाई फाटा येथील पार्किंग तळावरही वाहतूक कोंडी झाली होती. सातारा-कास याच मार्गाने पर्यटक ये-जा करत असल्याने सायंकाळी पाचनंतर संपूर्ण परिसरातील पर्यटक साताऱ्याकडे वळाल्याने यवतेश्वर घाटातही संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अंधारी-कोळघर-सह्याद्रीनगर मार्गे वाहने बाहेर काढणे गरजेचे असताना कास परिसरातच वाहतूक फिरत असल्याने ही कोंडीची समस्या कायम राहणार आहे.

कास फुलोत्सवाचा हंगाम सुरू झाला असून, महत्त्वाच्या १३२ फुलांच्या जातींपैकी तेरडा, सीतेची असवे, धनगरी फेटा, मिकी माऊस, कंदील पुष्प आणि चवर ही विविध रंगांची फुले येऊ लागली आहेत. मागील काही दिवसांपासून पर्यटक गर्दी करू लागले आहेत. सातारा हिल मॅरेथॉन आणि रविवारच्या सुटीमुळे ऑनलाइन बुकिंग करून येणारे तीन हजार व ऑफलाइन पद्धतीने तीन ते चार हजार असे सुमारे सात हजार पर्यटक आज पठारावर आले होते. आज सकाळीच घाटाई फाटा येथील पार्किंग व कास तलाव येथील पार्किंग वाहनांनी फुल्ल झाले. त्यातच दुपारी १२ नंतर सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा झाल्यानंतर पर्यटकांनी हजेरी लावल्याने व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

सातारा कडून येणारी घाटाई फाटा पार्किंग व कास तलाव पार्किंग या दोन ठिकाणी लागत असून पर्यटकांना कास पठार पाहून पुढे कास अंधारी, कोळघर, सह्याद्रीनगर मार्गे मेढा सातारा अशी वाहतूक वळविल्यास वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी कमी होऊ शकते. परंतु कास पठार परिसरातच सर्व पर्यटक व वाहने एका ठिकाणी एकवटत असल्याने वाहतूक कोंडीसह पर्यटकांची ही कोंडी होत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बॉम्‍बे रेस्‍टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
अंबवडे येथे चोरट्याला ग्रामस्थांकडून बेदम चोप

संबंधित बातम्या