उंब्रज : दारूचे बील देण्याच्या कारणावरून हॉटेल मॅनेजरला मारहाण करून जखमी करत हॉटेलच्या गल्यातील सुमारे 70 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच हॉटेलमधील दारूच्या बाटल्यांसह टेबल खुर्चीचे नुकसान करणार्या सातजणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या गुन्ह्यातील तिघांना पोलिसांनी अटक केले आहे.
प्रथमेश चंद्रकांत पाटील (वय 26, मुळ रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण, सध्या रा. वृदांवन सिटी, मलकापूर), अजय बापुराव यादव (वय 20, रा. तुळसण, ता. कराड), विराज प्रकाश देसाई (वय 20, रा. कुसुर, ता. कराड), दत्ता कोळेकर (रा. मुनावळे, ता. कराड) यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जखमी हॉटेल मॅनेजर रोहित सयाजी भोसले (वय 23, रा. भोसलेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल वंदन बिअर बार अँड लॉजिंग येथे दि. 6 रोजी संशयितांना दारूचे बिल देण्यासाठी विचारले असता फिर्यादी भोसले यांना मारहाण करून हॉटेलमधील गल्ल्यातील 70 हजार रूपयांची रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन सीसीटीव्हीच्या वायर तोडून डीव्हीआर काढून घेऊन रिव्हॉल्व्हरसारखे शस्त्र भोसले यांना दाखवून हॉटेलमधील दारूच्या बाटल्या, टेबल, खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले. यावेळी फिर्यादी भोसले यांना खुर्च्या फेकून मारून, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पैसे तसेच सीसीटीव्ही डिव्हीआर घेऊन गेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.