सातारा : जिल्ह्यात स्तनपान व शिशुपोषण विषयक जनजागृतीसाठी सातत्याने व प्रभावी कार्य करणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका सौ. लीना सचिन पवार यांना श्री पांडुरंग सुदामे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा सन 2025 या वर्षाचा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र शासन व बी.पी.एन. आय (Breast Feeding Promotion Network of India – BPNI) यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा पुरस्कार त्यांच्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याची पावती आहे. या पुरस्काराचे वितरण समारंभ पूर्वक अलिबाग येथे बीपीएन आय चे अध्यक्ष डॉ सौ सुषमा मलिक, सचिव डॉक्टर स्वाती जाधव, प्रशिक्षण समन्वयक डॉ प्रशांत गांगल, कायदेशीर सल्लागार डॉ अलका कुथे व बीपीएन आय महाराष्ट्र अंतर्गत कार्यरत असलेले सदस्य व कार्यकारणी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
सौ. लीना पवार यांनी गेल्या २० वर्षांहून अधिक काळ सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात माता व बाल आरोग्य, स्तनपानाचे महत्त्व, शिशुपोषण, बालकांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक पोषण याबाबत व्यापक जनजागृती केली आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका,आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य कर्मचारी यांची विविध स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम तसेच विविध उपक्रम राबविले
पोषण अभियानांतर्गत व सातारा जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण मिशन धाराऊ अभियान अंतर्गत प्रशिक्षण, किशोरी समुपदेशन शिबिरे, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, पालक बैठका यांद्वारे स्तनपानाचे फायदे समाजापर्यंत पोहोचवले. नवजात शिशू व मातांच्या आरोग्यावर विशेष भर देत त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यात बालकांच्या पोषण दर्जा मध्ये सुधारणा होण्यास मदत झाली आहे.
बी.पी.एन. आय, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार स्तनपान व शिशुपोषण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. यावर्षी सातारा जिल्ह्यातून सौ. लीना पवार यांची निवड करण्यात आली आली. या सन्मानाबद्दल सातारा जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभाग व सामाजिक संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.