...तर महा-ई-सेवा केंद्रांची चौकशी लावणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 12 July 2025


कराड : महा-ई-सेवा केंद्रात शासकीय फी व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी जादा रक्कम घेतली जात असल्यास संबंधितांनी याबाबत लेखी तक्रार करावी अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. लेखी सूचना प्राप्त होताच आपण या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देऊ असे स्पष्ट संकेत मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

पालकमंत्री शंभूराज देसाई हे शुक्रवारी सायंकाळी कराडमध्ये शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारण्यासाठी काही काळ थांबले होते. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील, राजेंद्र माने, सुलोचना पवार यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा सुरू असताना कराड तालुक्यात महा-ई-सेवा केंद्राकडून शासकीय फी व्यतिरिक्त ज्यादा पैसे घेऊन विद्यार्थ्यांसह पालकांची लूट केली जात असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर असा प्रकार होत नाही असे स्पष्ट करत महा ई सेवा केंद्रात शासकीय फी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी आकारली जाऊ नये असे स्पष्ट आदेश आहेत. तसेच शासकीय फी जमा केल्यानंतर त्याची पावतीही संबंधितांना देण्याचे स्पष्ट आदेश असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. 

मात्र त्यानंतरही जर महा-ई-सेवा केंद्रात जादा पैसे घेऊन पालक आणि विद्यार्थी यांची लूट केली जात असेल तर याबाबत आपणास लेखी तक्रार प्राप्त होणे आवश्यक आहे. लेखी तक्रार प्राप्त झाल्यास आपण शालेय विद्यार्थ्यांसह शेतकरी तसेच अन्य कोणत्याही लोकांकडून ज्यादा पैसे घेतले जात असल्यास संबंधितांची चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याची स्पष्टोक्ती मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. चौकशीनंतर ज्यादा पैसे घेणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कराड शहरातील जवळपास सर्वच सिग्नल चौकात मोठ्या प्रमाणावर हातगाडा व्यावसायिकांनी अतिक्रमण केली आहेत. हातगाडा व्यावसायिकांसह काही अन्य व्यावसायिकांनी चौकात मनमानीपणा सुरू केला आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटवण्याची सूचना करावी या आशयाचे निवेदन नागरिकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना यावेळी दिले. याची दखल घेत सिग्नल चौकातील अतिक्रमणे त्वरित हटवा अशी सूचना पालकमंत्री देसाई यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला सहा पुरस्कार
पुढील बातमी
पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात

संबंधित बातम्या