सातारा दि. 15 : सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी नवनवीन कल्पकतेमधून शासनाच्या योजनांचा आपल्या प्लॅटफार्मवरुन प्रसार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात सातारा जिल्ह्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांची बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स उपस्थित होते.
नागरिक सोशल मीडियाकडे जास्त आकर्षीत झालेले दिसत आहेत. या सोशल मीडियाचा शासनाच्या योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी वापर करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर प्रसारीत करावयाचा मजकूर प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, दिलेल्या मजकूवरुन योजनेचा मतीतार्थ न बदलता तुमच्या कल्पनेनुसार कन्टेट तयार करुन नागरिकांना समजेल, अशा भाषेत सोशल मीडिया प्लॅटफार्मवर प्रसारित करावा. तसेच प्रशासनाकडून लोकाच्या हिताच्या दृष्टीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांनाही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आमंत्रित करण्यात येईल.
सेवा पंरधरवड्यानिमित्त प्रत्येक स्वस्तधान्य दुकानाच्या दर्शनी भागात क्युआर कोड लावण्यात येणार आहे. हा क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर धान्य वेळेत मिळते का, कोट्या प्रमाणेच धान्य मिळते का यासह विविध प्रश्न विचारले जाणार असून याची उत्तरे ग्राहकांनी द्यावयाची आहेत. याचीही प्रसिद्धी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी करावी, असे आवानही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.
या बैठकीत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनीही आपले प्रश्न मांडले. मांडलेल्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सविस्तर चर्चा केली.