फलटण : विडणी, ता.फलटण येथील 25 फाटा ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला असून उसाच्या शेतात महिलेच्या साडी जवळ नारळ, कुंकू, गुलाल, महिलेचे कापलेले केस, तेलाचा दिवा, काळी बाहुली, सुरी मिळून आल्याने सदर प्रकार अघोरी नरबळी असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी, विडणी, ता. फलटण 25 फाटा येथील प्रदीप जाधव यांच्या उसाच्या शेतात निर्मनुष्य ठिकाणी अंदाजे 4/5 दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने अज्ञात महिलेचा खून करुन मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाला असून अज्ञात महिलेचा अर्धवट मृतदेह सडलेला अवस्थेत आढळून आला आहे. कोणत्यातरी जनावराने मृतदेहाचा कंबरेपासून सडलेला भाग उसाच्या शेतातून ओढून बाहेर आणला असता ही घटना लक्षात आली.
महिलेचे कंबरेपासून खालचे धड वेगळे होते, तर कवटी दोनशे तिनशे मीटर अंतरावर पाण्याच्या पाटात आढळून आली. मात्र, मधले धड घटनास्थळी दिसून आले नाही. धडाचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत.घटनेची माहिती पोलीस पाटील शितल नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कळवली. घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक वैशाली कडूकर, उप विभागीय अधिकारी राहूल धस, पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक, उपनिरीक्षक मच्छिद्र पाटील, शिवाजी जायपत्रे, शिवानी नागवडे यांनी भेट दिली आहे.
परिसरातील उसाच्या शेतात पाहणी केली असता उसाच्या शेतात काही अंतरावर नारळ, गुलाल, महिलेचे कापलेले केस, तेलाचा दिवा मिळून आल्याने हा प्रकार नरबळीचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.