वाठार स्टेशनमध्ये अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू; दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक

by Team Satara Today | published on : 04 November 2025


कोरेगाव :  कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे झालेल्या भीषण मोटरसायकल अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाठार स्टेशन ते सातारा राज्य मार्गावरील भारत पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात मृत झालेल्यांची नावे सागर लालासो माने (वय २९, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) व किशोर नंदू कदम (वय ४०, रा. सोमनाथ जळगाव, ता. जि. जालना) अशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर माने हे एचएफ डिलक्स मोटरसायकल (क्र. एमएच ११ डीएल ५६६४) वरून सातारा बाजूने आपल्या घरी येत होते. त्याचवेळी वाठार स्टेशनकडून किशोर कदम हे मोटरसायकल (क्र. एमएच २० एफक्यू ७४४३) वरून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. दोन्ही मोटरसायकलींची पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेत दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन दोघेही जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील पंढरीनाथ माने यांनी याबाबत वाठार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वाठार स्टेशन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विनोद जळक सातारा पालिकेचे नवे मुख्याधिकारी; अध्यादेश मंगळवारी सायंकाळी जाहीर, राज्यातील 65 मुख्याधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या
पुढील बातमी
वाईच्या सिध्दी गाढवेचे राज्य तलवारबाजी स्पर्धेत यश; आर्थिक टंचाईवर मात करत मिळवले रौप्यपदक

संबंधित बातम्या