सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्रामीण भागातील जुनी कामे अपूर्ण आहेत. ही कामे संबंधित यंत्रणांनी येत्या आठ दिवसात पूर्ण करावीत, तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी पाटील यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी (रोहयो) वृषाली मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांच्यासह दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
संबंधित यंत्रणांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जुन्या कामांची यादी तयार करुन ती कामे पूर्ण करावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, जुनी कामे पूर्ण केल्यानंतरच नवीन कामे हाती घ्यावीत. जुनी कामे का प्रलंबित राहिली याचा सविस्तर अहवाल सादर करावा. तसेच झालेल्या कामांचे सोशल ऑडीट तात्काळ करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.
सेवा पंधरवडा जिल्ह्यात येत्या 2 ऑक्टोंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. ज्या पाणंद रस्त्यांचा शेतकऱ्यांनी मंजुरी दिली तसेच रस्त्याला मान्यता मिळाली आहेत, असे रस्त्यांची कामे सेवा पंरधरवड्यात पूर्ण करावीत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत जास्त क्षेत्र बांबू लागवडी खाली कसे येईल, यासाठी ग्रामपंचायत विभाग, सामाजिक वनीकरण व कृषी विभागाने प्रयत्न करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी केल्या.