सातारा : गृह कर्जाच्या बोजाची मालमत्ता पत्रकाची नोंद करण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कराड भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक कुंडलिक खंडू मोडक (वय 38, रा. कराड, मूळ रा. खटकाळे, ता. जुन्नर, जि. पुणे) याला सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडला.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदारांनी त्यांच्या गृहकर्जाचा बोजा मालमत्ता पत्रकी नोंद करण्यासाठी कुंडलिक मोडक यांची भेट घेतली होती. त्यावेळी काम करुन देण्यासाठी मोडक याने पंचासमक्ष 7 हजार रुपयांची मागणी केली होती. दि. 3 रोजी सापळा रचला असता कारवाईवेळी 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोडकला पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मोडक विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सातारा विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटी, पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारेयांच्या पथकाने सहभाग घेतला. त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जून भोसले यांनी मार्गदर्शन केले.