सातारा : प्रतापसिंहनगर, खेड परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादावादीतून नैराश्य आल्याने १७ वर्षीय युवकाने शुक्रवारी (दि. २०) झाडाला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान, त्याला उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात नेले असताना शनिवारी (दि. २१) त्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आश्रूबा दत्ता गायकवाड (वय - १७, रा. प्रतापसिंहनगर, खेड, जि. सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे.
दरम्यान, सदर युवकाचा मारहाण करुन खून केला असल्याचा आरोप मृत युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, सातारा पोलिसांनी खूनाच्या चर्चेच्या प्रकाराला स्पष्ट शब्दांत नकार दिला असून आत्महत्त्येच्या प्रयत्नानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान सदर युवकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, आश्रूबा गायकवाड (रा. प्रतापसिंहनगर, खेड) याचे परिसरातील एका गटाशी वादावादी झाली होती. त्यानंतर आश्रूबा हा नैराश्य अवस्थेत होता. दरम्यान शुक्रवारी (दि. २०) रात्री तो अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली होती. त्यावेळी त्याचे काही नातेवाईक सातारा पोलिसांत त्याबाबत तक्रार देण्यास गेले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास तो परिसरात असल्याची माहिती समजल्यानंतर पोलिस व नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तो तेथील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत उपस्थितांना आढळून आला. त्यानंतर उपस्थित नातेवाईक, नागरिक व पोलिसांनी त्याला तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शनिवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात समजताच काही काळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, मृत युवकाच्या नातेवाईकांनी आश्रूबा याला मारहाण करणाऱ्या युवकांच्या टोळीनेच त्याचा खून केला असल्याचा आरोप केला आहे. तर आश्रूबा गायकवाड याने नैराश्येतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे आणि शनिवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, वादावादीच्या घटनेच्या अनुषंगाने पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत असून रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्याचे काम सातारा पोलिसांत सुरू होते. त्यामुळे अधिकची अधिकृत माहिती समजू शकली नाही. मात्र, या घटनेमुळे शनिवारी शहर व परिसरात एकच खळबळ उडाली होती.