नवी दिल्ली : नशिबाची थट्टा म्हणावी की आणखी काही... दिवसभर उन्हातान्हात बाईक चालवून जेमतेम ५००-६०० रुपये कमवून कुटुंबाचं पोट भरणाऱ्या एका सामान्य रॅपिडो चालकाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ज्याच्या खिशात हजार रुपये टिकत नाहीत, त्याच्या बँक खात्यातून तब्बल ३३१ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचं उघडकीस आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. खुद्द 'ईडी'च्या (ED) अधिकाऱ्यांनाही या गरिबाच्या दारात गेल्यावर धक्का बसला आहे.
सध्या 'ईडी' कडून १एक्स-बेट (1xBet) या कुख्यात ऑनलाइन बेटिंग ॲप आणि मनी लाँडरिंग प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. पैशांचा ओघ कुठून कुठे जातोय, याचा शोध घेत असताना अधिकाऱ्यांना एका बँक खात्यात ३३१.३६ कोटी रुपयांचे प्रचंड व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. या खात्याची पाळेमुळे खणत अधिकारी जेव्हा दिल्लीतील त्या पत्त्यावर पोहोचले, तेव्हा समोरचं दृश्य पाहून ते थक्क झाले.
झोपडीत राहणारा 'कोट्यधीश'!
बँकेत ज्याच्या नावावर कोट्यवधींची उलाढाल झाली, तो व्यक्ती चक्क एका झोपडपट्टीत, दोन खोल्यांच्या घरात राहत होता. हा व्यक्ती रॅपिडो (Rapido) बाईक टॅक्सी चालवून दिवसाला ५०० ते ६०० रुपये कमवतो. यातूनच त्याच्या संसाराचा गाडा चालतो. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याला "तुझ्या खात्यात ३३१ कोटी आलेत," असं सांगितलं, तेव्हा त्याला धक्काच बसला.
'म्यूल अकाऊंट'चा असाही वापर!
तपासात असे समोर आले आहे की, हा प्रकार 'म्यूल बँक अकाऊंट' (Mule Account) या फसवणुकीचा भाग आहे. म्हणजे, बड्या गुन्हेगारांनी या गरिबाची कागदपत्रे वापरून त्याच्या नकळत हे बँक खाते उघडले आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी किंवा लपवण्यासाठी त्याचा वापर केला. अवघ्या काही महिन्यांत या खात्यातून ३३१ कोटी फिरवण्यात आले, आणि बिचाऱ्या रॅपिडो चालकाला याची पुसटशी कल्पनाही नव्हती.