नवी दिल्ली : तेलंगणा, ओडिशा आणि जम्मू आणि काश्मीरमधील विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.६) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. यामध्ये जम्मू रेल्वे विभाग आणि तेलंगणातील एका टर्मिनल स्टेशनचा समावेश आहे. तसेच पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली.
2025 च्या सुरुवातीपासून भारत जोडणीचा वेगवान कायम राखला आहे. रविवारी (दि.५) मला दिल्ली एनसीआरमध्ये 'नमो भारत' ट्रेनचा अद्भुत अनुभव आला आणि दिल्ली मेट्रोच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला. आता आपल्या देशात मेट्रोचे जाळे एक हजार किलोमीटरहून अधिक आहे. गेल्या दशकात भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक कायापालट झाल्याचे आपण पाहिले आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल झाला आहे. यामुळे देशाची प्रतिमा बदलली आणि देशवासीयांचे मनोबलही वाढले आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा, देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेची जोडणी आणि रोजगार निर्मिती आणि उद्योगांना पाठिंबा, या चार मापदंडांवर आम्ही भारतीय रेल्वेचा विस्तार करत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटन पठाणकोट - जम्मू - उधमपूर - श्रीनगर - बारामुल्ला, भोगपूर सिरवाल - पठाणकोट, बटाला - पठाणकोट आणि पठाणकोट ते जोगिंदर नगर विभागांना जोडेल. त्याची लांबी 742.1 किलोमीटर असेल. यामुळे भारताच्या इतर भागांतील रेल्वे संपर्कही सुधारेल. जम्मू विभागाच्या उद्घाटनामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पायाभूत सुविधांचा विकास होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि प्रदेशाचा एकूण सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
तेलंगणामधील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्टेशनच्या ४१३ कोटी रुपये खर्च आला आहे. मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. हे नवीन टर्मिनल स्टेशन पर्यावरणपूरक असेल, प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा असतील. यामुळे सिकंदराबाद, हैदराबाद आणि काचेगुडा यांसारख्या शहरांमधील सध्याच्या कोचिंग टर्मिनल्सवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान मोदींनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगड रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी करणार आहेत. यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि आसपासच्या भागात कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रादेशिक विकासालाही चालना मिळणार आहे.