सातारा : रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट, सातारा व सातारकर नागरिकांतर्फे दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या आणि सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला संस्थेला "सातारा भूषण" पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षीचा हा पुरस्कार पद्मभूषण जेष्ठराज भालचंद्र जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे स्व. अरुणराव गोडबोले यांच्या मासिक श्राद्ध दिनी या पुरस्काराची घोषणा ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे विश्वस्त परिवाराने केली असून लवकरच एक भव्य कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या ट्रस्टचे विश्वस्त डॉ.अच्युत गोडबोले यांनी दिली.
स्वर्गीय अरुण गोडबोले यांनीच जोशी यांच्या नावाची निवड केल्यामुळे हा पुरस्कार आवर्जून ज्येष्ठराज जोशी यांना प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री . ज्येष्ठराज जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूर येथे झाला असून त्यांचे शालेय शिक्षण कराड येथे पूर्ण झालेले आहे डॉक्टर जेष्ठराज जोशी यांनी डॉक्टर होमी भाभा इन्स्टिट्यूट, मुंबई तसेच परदेशातील अनेक विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम केले आहे. 54 वर्षे संशोधन व अध्यापनाचे काम करणारे श्री. जोशी यांना सन 2014 साली पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारने गौरविलेले असून त्यांना याबरोबरच भटनागर पुरस्कार, उत्तम शिक्षक पुरस्कार आदी मान्यवर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे त्यांची 1000 हून अधिक संशोधनावरील विशेष पब्लिकेशन ही प्रकाशित करण्यात आली असून नवीन प्रकारच्या केमिकल व औद्योगिक इंजीनियरिंग मधील संशोधनासाठी त्यांनी केलेले संशोधन व अध्यापनाचे काम खरोखरच गौरवपूर्ण असे आहे जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेसाठी विशेष योगदान दिले असून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी ही त्यांनी केलेले कार्य हे गौरवपूर्ण असे आहे अनेक नामवंत अकॅडमीचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले असून 200 हून अधिक विद्यार्थी त्यांच्या शोधनिबंधांवर अभ्यास करून त्यांनीही पीएचडी ही पदवी प्राप्त केलेली आहे. अनेक नवनवीन शोध श्री. जोशी यांनी लावले असून विविध प्रकारची अतिशय सुरेख अशी डिझाईन्स श्री. जोशी यांनी आत्तापर्यंत तयार केलेली आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून सातारा जिल्ह्यातील मूळ असलेल्या श्री. जोशी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
रासायनिक, अभियांत्रिकी आणि अणुविज्ञान क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून सन २०२५ च्या "सातारा भूषण" पुरस्कारासाठी पद्मभूषण जेष्ठराज भालचंद्र जोशी यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक मान्यवरांना सदर पुरस्काराने सन्मानित केले आहे. सदर परंपरा गेली ३४ वर्षे अखंडपणे चालू आहे. सन १९९१ पासून ट्रस्टने "सातारा भूषण" पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यामार्फत दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला "सातारा भूषण" पुरस्काराने गौरवले जाते. रोख रु. ४० हजार व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कै. रा. ना. तथा बन्याबापू गोडबोले हे साताऱ्याच्या आर्थिक, धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व होते. युनायटेड वेस्टर्न बैंक; आयुर्वेदीय अर्कशालाः समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड; श्रीराम मंदिर, चाफळ; श्री खिंडीतील गणपती व कुरणेश्वर देवस्थान; वेस्टर्न इंडिया ट्रस्टी कंपनी अशा अनेक संस्थांचे नेतृत्व करून त्यांनी त्या प्रगतीपथावर नेल्या. लहानपणी घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांना खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण करावे लागले. अनेक वेळा शारीरिक कष्टाची कामे करावी लागली. त्यामुळे आयुष्यात स्थैर्य मिळाल्यावर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याच्या मुख्य हेतूने त्यांनी १९७१ साली रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट हा ट्रस्ट स्थापन केला. केवळ एकाच कुटुंबाचा स्वतःच्या उत्पन्नातून जनहितार्थ कार्य करणारा हा आपल्या परिसरातील बहुधा एकमेव ट्रस्ट असेल.
कै. अरुण गोडबोले हे जेष्ठ कर सल्लागार होते. त्यांनी ५ मराठी चित्रपटांची निर्मिती केली. 'कौशिक प्रकाशन' या त्यांच्या संस्थेमार्फत १५० पुस्तके, कॅसेटस् चे प्रकाशन झाले आहे. शिवाय त्यांची स्वतःची ३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक सामाजिक संस्थात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. अशोक गोडबोले हे सिव्हील इंजीनिअर व कॉन्ट्रॅक्टर आहेत. डॉ. अच्युत गोडबोले बालरोगतज्ञ असून चिंतामणी नर्सिंग होम हे त्यांचे हॉस्पिटल गरीब रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. सातारा शहराचे नगराध्यक्षपद कै. रा. ना. गोडबोले यांनी १९६२ साली भूषविले होते. त्यानंतर २००७ साली डॉ. अच्युत यांनी ते भूषवले आहे. या तिघांच्या पुढच्या पिढीतील उदयन, प्रदयुम्न व डॉ. चैतन्य हे त्यांच्या व्यवसायात कार्यरत असून ट्रस्टमध्ये त्या तिघानीही मोलाची भर घातलेली आहे.